ऑस्ट्रेलिया – द. आफ्रिकेमध्ये आज काँटे की टक्कर

आपापले सलामीचे सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची झोकात सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन तुल्यबळ संघ उद्या (दि. 25) रावळपिंडी येथे भिडणार आहेत. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी विरुद्ध ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अशी ‘काँटे की टक्कर’ क्रिकेटप्रेमींना बघायला मिळणार आहे. मात्र, यातील एका संघाचा पराभव अटळ असल्याने कोण आधी उपांत्य फेरीचे तिकीट बुक करणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.

ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावसंख्येच्या लढतीत इंग्लंडचा पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला, तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवून आगेपूच केलीय. फलंदाजी ही उभय संघाचे बलस्थान होय. मात्र, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्प व जोश हेझलवुड यांच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी उघडी पडली. इंग्लंडने त्यांच्याविरुद्ध विक्रमी 351 धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी हा धावांचा डोंगर पार करण्यात यश मिळविले असले तरी प्रत्येक वेळी फलंदाजीवर अवलंबून राहणे नक्कीच त्यांना परवडणारे नाही. जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबुशेन, एलेक्स पॅरी व ग्लेन मॅक्सवेल यांनी अवघड वाटणारा विजय ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ व ट्रव्हिस हेड हे भरवशाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने विजयश्री खेचून आणल्याने हा संघही जेतेपदाच्या दावेदारीत आला आहे. स्पेन्सर जॉन्सनच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धुरा आहे. मॅक्सवेलही इंग्लंडविरुद्ध महागडा ठरला होता. लाबुशेन व शॉर्ट हे पार्टटाईम गोलंदाजाची भूमिका निभावू शकतात.

दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या रेयान रिकलटनला रोखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे असेल. दक्षिण आफ्रिकेसाठी तिसऱया, चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतके झळकवली होती. त्यामुळे तेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील या संघासाठी हे शुभ संकेत आहेत. पॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी धारदार वाटतेय. फक्त हेन्रिक क्लासेनचे सलग दुसऱया लढतीत खेळणे संदिग्ध आहे, एवढीच दक्षिण आफ्रिकेची एकमेव चिंता असेल.

उभय संघ

ऑस्ट्रेलिया – मॅथ्यू शॉर्ट, ट्रेव्हिस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), एलेक्स पॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, एडम झम्पा, स्पेंसर जॉनसन, जेक फ्रेजर-मॅकगर्प, आरोन हार्डी, सीन एबॉट, तनवीर सांघा.

दक्षिण आफ्रिका – रेयान रिकेलटन (यष्टिरक्षक), टोनी डी जोरजी, तेम्बा बावुमा (कर्णधार), रासी वैन डेर डुसेन, एडेन मार्परम, डेविड मिलर, वियान मुल्डर, माकाx यानसेन, केशव महाराज, पॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, हेन्रीक क्लासेन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, काॅर्बिन बॉश.