
अंथरुणात खिळलेल्या एका 17 वर्षीय दिव्यांग मुलीला तिच्याच आई आणि आजीने 20 फेब्रुवारी रोजी विष देऊन ठार मारले असल्याची घटना ठाण्याच्या नौपाडा गावदेवी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नौपाडा पोलिसांनी मुलीच्या आजीला आज ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रात्री दीड वाजता मृतदेह चारचाकीमधून घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे.
मुलीची हत्या केल्यानंतर त्याच दिवशी रात्री दीड वाजता चादरीमध्ये गुंडाळून मृतदेह एका खासगी चारचाकी गाडीमधून घेऊन जात होते. दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता मुलीला उपचारासाठी आम्ही गावी घेऊन जात असल्याचे आजीने सांगितले. दरम्यान, शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी नौपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 20 फेब्रुवारी रात्री मुलीला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये समजताच पोलिसांचा संशय आणखीन बळावला. त्यानंतर पोलिसांनी आजीला ताब्यात घेतल्यानंतर सातारा येथे मूळ गावी मुलीवर अंत्यसंस्कार केल्याची कबुली आजीने दिली.