बारामतीतील शेतकऱ्यांच्या ‘एआय’ उपक्रमाची जगभर दखल, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आणि उद्योगपती एलन मस्कही प्रेमात

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय आता सर्वच क्षेत्रांत आपले पाऊल ठेवत आहे. याला शेती क्षेत्रही अपवाद ठरले नाही. बारामती अॅग्रोने सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या एआय उपक्रमाची जगभर चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या या उपक्रमाची दखल मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला आणि उद्योगपती एलन मस्क यांनी घेतली आहे. ओपन एआयसोबतच्या भागीदारीद्वारे मायक्रोसॉफ्ट एआय नवोपक्रमात आघाडीवर असताना त्यांचे हे वक्तव्य आले आहे. आगामी काळात कृषी क्षेत्रात एआय अधिक सक्रियतेने वापरली जाण्याची शक्यतासुद्धा यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. सत्या नडेला यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एआय संचलित उपाय शेतकऱ्यांना कसे पॉवरफुल बनवत आहे, असे या व्हिडीओत दिसत आहे. या शेतकऱ्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून, रासायनिक वापर कमी, पाण्याचा वापर करून लक्षणीय सुधारणा केल्याचे दिसतेय.

शेतीवर एआयचा प्रभाव

सेन्सर फ्यूजन तंत्रज्ञान भू-स्थानिक डेटा, ड्रोन प्रतिमा, उपग्रह माहिती आणि माती डेटा रिअल-टाइममध्ये एकत्रित करते. त्यानंतर एआय शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मूळ भाषांमध्ये कृतीयोग्य अंतर्दृष्टी निर्माण करण्यासाठी या डेटावर प्रक्रिया करते, ज्यामुळे तंत्रज्ञान अत्यंत सुलभ होते. अनेक डेटा स्रोत एकत्र जोडण्याची आणि एआय लागू करण्याची ही क्षमता अभूतपूर्व आहे, असेही सत्या नडेला यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनीसुद्धा या व्हिडीओचे कौतुक केले आहे.