
हिंदुस्थानी शेअर बाजारात सोमवारचा दिवस ब्लॅक मंडे ठरला. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात महाभूकंप आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 854 अंकांची घसरण होऊन सेनेक्स 74,456 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 243 अंकांनी घसरून 22,552 अंकांवर स्थिरावला. विदेशी गुंतवणूकदार हे आपले पैसे मार्केटमधून काढत असल्याने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्याचा थेट परिणाम हिंदुस्थानी शेअर बाजारावर पडला आहे. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. सकाळी 9.55 ला सेन्सेक्स 703 अंकांनी घसरून 74,620 अंकांवर व्यवहार करत होता. बीएसईमध्ये टीसीएस, झोमॅटो, एचसीएल टेक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टाटा स्टील यासह 23 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक बँक, नेस्ले इंडिया, मारुती, आयटीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
विदेशी गुंतवणूकदार काढताहेत पैसे
हिंदुस्थानी शेअर मार्केटमधून विदेशी गुंतवणुकदारांनी पैसा काढण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन महिन्यात म्हणजेच 2025 या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 1 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसा काढून घेतला आहे. अवघ्या दोन महिन्यात 1,01,737 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या काळात 2,437.04 कोटी रुपयांची इक्विटी विकली आहे. विदेशी गुंतवणूकदार हिंदुस्थानी शेअर मार्केटमधून पैसे काढत असल्याने शेअर बाजार कोसळण्यामागील एक कारण आहे.