महाकुंभमधून परतल्यानंतर अनेकांना त्वचेचे आजार, फंगल इन्फेक्शन झाल्याची डॉक्टरांची माहिती

गंगा आणि यमुना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे असे अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. ही बाब आता खरी असल्याचे समोर आली आहे. अनेक भाविक जे महाकुंभ मध्ये पवित्र स्नान करायला आले होते त्यांना अनेक त्वचेचे आजार जडले आहेत. अनेकांना शरीरावर लाल जखमा झाल्या असून अनेकांना त्वचेवर खाज उठली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये त्वचारोग तज्ज्ञांकडे अनेक रुग्णांची रांग लागली आहे. अनेक रुग्णांनी शरीरावर लाल जखम, सतत खाज येण्याची तक्रार केली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करून आले आहेत. अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बराच वेळ ओल्या कपड्या राहणे, अस्वच्छता आणि कुंभमेळ्यात असलेल्या असुविधेमुळे हे आजार झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

57 वर्षीय रणजित कुमार हे महाकुंभमधून परत आल्यानंतर त्यांना अंगभर खाज सुटली होती. हा त्रास सहन न झाल्याने आपण डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्याचे कुमार यांनी सांगितले.