
वालचंदनगर परिसरात मानकरवाडी येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्या. बेशुद्ध करण्यासाठी चोरट्यांनी गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मानकरवाडी (ता. इंदापूर) येथील हरिदास यादव हे कळस येथील नेचर डिलाईट दूध डेअरीमध्ये काम करतात. ते पहाटे कामावरून घरी आले, तेव्हा त्यांच्या घराच्या अंगणात घरातील काही सामान अस्ताव्यस्त स्वरूपात दिसले. दागिने व कारखान्याला गाळप केलेल्या उसाची रक्कम पस्तीस हजार रुपयेदेखील चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यादव यांनी याची माहिती ग्रामस्थांना फोनवरून दिली. सणसर-कुरवली रस्त्याच्या बाजूला असणारे अमित मानकर घरासमोरील गेट कटावणीच्या साह्याने तोडून घरातून पाच ते सहा तोळे सोने व सत्तर ते ऐंशी हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
आम्हाला चोरी झाल्याची कोणतीही जाणीव झाली नाही. मानकर यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती सूज आली असल्याने कदाचित आमच्या चेहऱ्यावर स्प्रे मारल्याने आम्हीसुद्धा गुंगीच्या अवस्थेत असल्याचे मानकर यांनी सांगितले.
राजेंद्र निकम यांच्या घरीदेखील चोरी करण्याचा प्रयत्न केला. विजय कणसे यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची माहिती हरिदास यादव यांनी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वीदेखील भवानीनगर परिसरात अशाच पद्धतीने भाग्यनगर येथील पहाटे तीनच्या सुमारास दत्ता शिंदे यांच्या भाडेतत्त्वावर देणाऱ्या खोल्यांमधील अशाच पद्धतीने चोरट्याने धुमाकूळ घातला होता.