
वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. म्हणूनच तर वजन वाढल्यावर डाॅक्टर सर्वात आधी सकाळी उठून चालण्याचा सल्ला देतात. आहाराचे नीट व्यवस्थापन केल्यास, वजन आटोक्यात येण्यास सुरुवात होते. परंतु सरसकट चालण्यास सुरुवात केल्यावर, अनेकदा आपल्याला नवीन व्याधींना सामोरं जावं लागतं. अशावेळी तुमचा वयोगट कोणता आहे आणि तुम्ही किती चालायला हवं हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
रोज चालण्यामुळे शरीरास होणारे फायदे
चालण्याच्या व्यायामामुळे आपल्या मनावरील तणाव कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
मधुमेहींसाठी चालणं हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
चालण्यामुळे हाडांचे आरोग्यही सुधारते. चालण्याचा व्यायाम नियमितपणे केल्यास, हाडांना बळकटी प्राप्त होते.
हृद्य निरोगी ठेवण्यासाठी, चालणे हाच एक उत्तम उपाय आहे.
वयोमानानुसार किती चालायला हवे
18 ते 40 वयोगट- दिवसातून किमान एक किंवा कमीत कमी पाऊण तास जलद गतीने चालणे सर्वोत्तम. चालण्याच्या व्यायामाची सुरुवात सर्वात आधी मध्यम गतीपासून करावी, त्यानंतर फास्ट चालण्याचा सराव करणे सर्वात अधिक हितावह.
40 ते 60 वयोगट- दिवसातून किमान अर्धा ते पाऊण तास चालणे गरजेचे. सहजशक्य होत असेल तर, मध्यमगतीने चालणे हितावह आहे. शक्य नसल्यास, किमान हळूहळू चालणे गरजेचे.
60 वर्षांपेक्षा अधिक वयोगट- दिवसातून किमान वीस ते तीस मिनिटे चालणे हे गरजेचे आहे. किमान सकाळी पंधरा मिनिटे आणि संध्याकाळी पंधरा मिनिटे असे दोन टप्पे चालण्याचे असतील तर सर्वाधिक उत्तम.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)