
जर्मनीत रविवारी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून आता सर्वांना वेध लागले आहेत ते निकालाचे. दरम्यान, निकालाच्या आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये, उजव्या विचारसणीचे विरोधी पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्झ आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. एक्झिट पोलमध्ये फ्रेडरिक मर्झ यांच्या नेतृत्वाखालील CDU/CSU युती 28.5 ते 29 टक्के मतांनी निवडणूक जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
AfD चा टक्का वाढला, पण सत्तेपासून दूर?
जर्मनची पब्लिक ब्रॉडकास्टर ARD आणि ZDF च्या प्राथमिक आकडेवारीनुसार कडवट उजवी असलेली स्थलांतरविरोधी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (AfD) 19.5 ते 20 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत, AfD ची यंदाची कामगिरी जवळजवळ दुप्पटीने झाल्याचं पाहायला मिळेल असे चित्र आहे.
स्थलांतरितांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतर इमिग्रेशन आणि सुरक्षेबद्दलची भीती आणि अर्थव्यवस्थेबद्दलच्या चिंतेमुळे AfD ला वाढते समर्थन दिसत आहे. परंतु या आघाडीनंतर देखील AfD सध्या सत्तेबाहेर राहणार आहे, कारण त्यांच्या संभाव्य युती भागीदारांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर फ्रेडरिक मर्झ हे चान्सलर होणार हे निश्चित आहे. परंतु संसदेत बहुमत मिळविण्यासाठी, फ्रेडरिक मर्झ यांना अन्य काही पक्षांना सोबत घेऊन काम करावे लागेल.