तीन दिवस आधी अनारक्षित तिकीट बुकिंग शक्य, काउंटरवरील गर्दी कमी करण्यासाठी उपाय

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 200 किमीपेक्षा अधिक अंतरावरील प्रवासासाठी तीन दिवस आधी अनारक्षित तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. अनारक्षित तिकीट प्रणालीवर (यूटीएस) ही सुविधा उपलब्ध असेल. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

होळी, दिवाळी, उन्हाळी सुट्टी, ख्रिसमस तसेच इतर सुट्टय़ांच्या काळात रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी अनारक्षित तिकिटाचे तीन दिवस आधी बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यूटीएस बुकिंग खिडक्यांवर शेवटच्या कालावधीत अधिक गर्दी होते. या गर्दीपासून प्रवाशांची सुटका करणे हे उद्दिष्ट पश्चिम रेल्वेने ठेवले आहे.