
एकीकडे कर्नाटकमध्ये कन्नडिगांनी महाराष्ट्रातील एसटीचालकांना कन्नड बोलण्याची सक्ती करून उन्माद घातला. तोंडावर काळे फासण्याइतपत अतिरेक केला. त्यावरून तीव्र संतापाची लाट असताना महाराष्ट्र सरकारने मात्र कर्नाटकच्या बसना राज्यात पायघडया अंथरल्याचे संतापदायी चित्र आहे. महाराष्ट्राच्या एसटीची कर्नाटकातील सेवा बंद करण्यात आली. परंतु, कर्नाटकच्या बस रविवारीही महाराष्ट्राच्या रस्त्यावर मुक्तपणे धावल्या. यातून महायुती सरकारची दुटप्पी भूमिका उघड झाली.
शुक्रवारी रात्री कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांशी हुज्जत घातली. या घटनेचे सीमावर्ती भागात तीव्र पडसाद उमटले. कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या बस अडवून कन्नडिगांच्या मुजोरीचा निषेध केला. मराठी जनतेच्या अस्मितेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने महायुती सरकारने कन्नडिगांविरोधात जशास तशी भूमिका घेण्याची मागणी होत आहे. मात्र रविवारी महायुती सरकारच्या कचखाऊ भूमिकेमुळे कर्नाटकच्या बसचा महाराष्ट्रात मुक्तसंचार सुरूच राहिला. मिरज आगारातून कर्नाटक राज्य परिवहन विभागाने खास निरीक्षक नेमून बसमधून प्रवासीसेवा सुरु ठेवली. कन्नडिगांच्या उन्मादानंतरही महायुती सरकारने कर्नाटकच्या बसना पायघड्या अंथरल्याचे यातून स्पष्ट झाले. त्यामुळे कन्नडिगांबरोबरच महायुती सरकारविरोधात मराठी जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.