
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार तसेच दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचे आज निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पुतणी आहे. भावे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भावे यांनी विपुल बालसाहित्य लेखन केले. ‘वडापाव’ हे त्यांचे सदर गाजले. साहित्य अकादमीचा 2014 चा बालसाहित्य पुरस्कार त्यांना मिळाला होता.
श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’ साप्ताहिकात भावे स्तंभलेखन करीत. 1983 मध्ये मुंबईत भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम हा परिसंवाद विशेष गाजला. भावे यांचे बालवाङ्मय प्रसिद्ध आहे. रूपारेल कॉलेजमध्ये विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. संजय भास्कर जोशी यांचे पडद्यावरचे विश्वभान आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांचे ऐवज हे आत्मचरित्र त्यांनी अनेकांना स्वखर्चाने वाटले.