सावधान! मुंबईची विषारी हवा पोखरतेय फुप्फुस कर्करोगाचा धोका; मास्क घाला, धुरके टाळा

दीपक, पवार मुंबई

दिल्लीनंतर मुंबईत प्रदूषणाने अक्षरशः कहर केला आहे. दक्षिण मुंबईसह वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स. शीव, चेंबूर, माझगाव, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसरमधील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. ही विषारी हवा हळूहळू फुप्फुस पोखरत आहे. वाहने, बांधकामे, शेकोटय़ा, कचरा जाळणे यांमधून निघणारा रेडॉन, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन, सल्फर डायऑक्साईड  यांसारख्या घातक आणि विषारी वायूमुळे कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच प्रदूषण वाढल्याचे दिसताच मास्क घालणे, धुरके टाळणे आणि वाहतूककोंडीत सर्वाधिक काळजी घेणे असे उपाय करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून निघणाऱ्या घातक वायू आणि विविध प्रकारची बांधकामे यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फुप्फुसावर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती पवईच्या हिरानंदी रुग्णालयातील मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर सुहास आग्रे यांनी दिली. विशेषतः रेडॉन, नायट्रोजन  डायऑक्साईड आणि अ‍ॅस्बेस्टॉसचे कण यांमुळे श्वसनाचे आजार जडतात. त्यातूनच मग पुढे प्रकरण कर्करोगाचे निदान होण्यापर्यंत जात असल्याचे डॉ. आग्रे म्हणाले.

अ‍ॅडेनोकर्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, स्मॉल-सेल आणि लार्ज-सेल कार्सिनोमा हे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे चार उपप्रकार समोर आल्याचे ‘लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल’ने अलीकडेच प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालातून समोर आले आहे.

2022 मध्ये  9,08,630 महिलांना फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यापैकी 59.7 टक्के म्हणजेच 5,41,971 केसेस अॅडेनोकार्सिनोमा प्रकारातील होत्या. अ‍ॅडेनोकार्सिनोमामुळे ग्रस्त झालेल्या महिलांमध्ये 80,378 घटना वायू प्रदूषणामुळे झाल्याचे ‘लॅन्सेट’च्या अहवालात म्हटले आहे.

देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर आजारांचे आगर

देवनार डंपिंग ग्राऊंड परिसरातील मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, चेंबूर या भागातील नागरिकांना तर अस्थमा, टीबी, कर्करोग अशा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. उपचारांवर लाखो रुपये खर्च होत आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या एसएमएस या पंपनीत बायोवेस्ट जाळले जाते. त्यातून निघणाऱ्या विषारी वायुमुळे येथील लोकांचे जगणे मुश्कील झाल्याचे देवनार येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते समीऊल्ला अन्सारी यांनी सांगितले. डंपिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा राहत आहे. त्याची चिमणी एसएमएस पंपनीच्या चिमणीपेक्षा पाचपट मोठी आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणावर विषारी वायू बाहेर पडणार असल्याने येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान,  शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात 70 टक्के रुग्ण अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, देवनार, चेंबूर येथील असल्याचे अन्सारी म्हणाले.

80 ते 90 टक्के केसेस चौथ्या किंवा अ‍ॅडव्हान्स स्टेजमधील

धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांना कर्करोग होण्याचा धोका अधिक असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गावखेडय़ांमध्ये चुली, शेगड्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार बळावत आहेत. शहरात 80 ते 90 टक्के केसेसमध्ये चौथ्या किंवा अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये निदान झालेले रुग्ण समोर येत आहेत, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयातील मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. विजय पाटील यांनी दिली. दरम्यान, प्रदूषणामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. गेल्या चार वर्षांत प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढले असून श्वसनाचे आजार बळावल्याचे डॉ. सचिन आल्मेल यांनी सांगितले.

15 वर्षे उलटलेल्या वाहनांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे कार्बन, सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजनचे हवेतील प्रमाण प्रचंड आहे.

12 हजारांवर बांधकामे, मेट्रोची कामेही सुरू आहेत. त्यामुळे धुळीचे कण, अॅस्बेस्टॉसचे प्रमाण हवेत अधिक असल्याने श्वसनाचे आजार वाढल्याचे वातावरण फाऊंडेशनचे भगवान केसभट यांनी सांगितले.