यूकेमध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा समारोह महाराष्ट्र मंडळाने इंग्लंड (यूके) मधील लिव्हरपूल येथे मोठय़ा उत्साहाने साजरा केला. शिवरायांचा भगवा झेंडा मानाने आणि डौलाने परदेशात अटकेपार फडकावला. यावेळी संपूर्ण शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष घुमला. याचे सोशल मीडियावर काwतुक होत आहे.

इंग्लंडमधील लिव्हरपूलमध्ये शिवजयंतीचा उत्साह यंदाही दिसला. मुंबईतील अनिकेत मोरे, अनिकेत शेलार, संतोष देसाई, विनीत सुवर्णा, ठाण्याचे शुभम माने, कल्याणचे सागर धात्रंगे,  सोलापूरचे मंगेश खरात, नांदेडच्या पंधारचे पुंटेवार, कोल्हापूरचे अमोल शिर्पे, निखिल कसबे, मानसी महाडीक, स्वाती पटेल, स्मिता खरात, काजल हिर्लेकर या महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा कोपऱयातून लिव्हरपूल लंडन येथे कामानिमित्त स्थायिक झालेल्या शिवप्रेमींनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव दणक्यात साजरा केला. माजी व्हीएचपी यूके प्रमुख गिरीधारीलाल भान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली. भगवा ध्वज, फेटे घालून ढोलताशांच्या गजरात संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली.