
पंजाबमधील विमानतळावर आणण्यात येणाऱ्या अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरल्यानंतर यावेळी 12 बेकायदा स्थलांतरितांची चौथी तुकडी आज सायंकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यापैकी 4 जण पंजाबचे आहेत. या सर्वांना यापूर्वी अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर पनामाला पाठवण्यात आले होते. तेथून त्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले. याआधी जवळपास 332 बेकायदा स्थलांतरितांची परत पाठवणी करण्यात आली आहे.
यावेळी अमेरिकेने विशेष विमान नाही तर साध्या विमानाने सर्वांना हिंदुस्थानात परत पाठवले. या सर्वांची लष्कराचे अधिकारी चौकशी करत आहेत. त्यांची चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. पनामा येथून आणण्यात आलेली बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानींची ही पहिलीच तुकडी आहे. याआधी अमेरिकेने 332 बेकायदा स्थलांतरितांना थेट हिंदुस्थानात पाठवले होते.
बेकायदा स्थलांतरितांचा आकडा 344 वर
आतापर्यंत पाठवण्यात आलेले 332 आणि आज पाठवण्यात आलेल्या 12 हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांची संख्या मिळून आतापर्यंत तब्बल 344 बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी अमृतसर येथे दाखल झाले होते. यात 104 जण होते. 15 फेब्रुवारी रोजी 116 आणि 16 फेब्रुवारी रोजी 112 हिंदुस्थानीना घेऊन अमेरिकन लष्कराचे विमान हिंदुस्थानात दाखल झाले होते.