
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. तरीही महायुती सरकार त्याची दखल घेत नाही. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारसह भारतीय जनता पक्षावर आज निशाणा साधला. कोकाटे, मुंडे आणि न्यू इंडिया बँक बुडवणाऱ्यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्व आहे काय, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली. शिवसेनेच्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे, भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? असा खणखणीत सवालही त्यांनी केला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळय़ांमुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री कोटय़ातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात न्यायालयाने निकाल दिला आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारबरोबरच भाजपाचाही शेलक्या भाषेत समाचार घेतला.
शिवसेनेचा निकाल रखडलाय, कोकाटेंबाबत निकाल आलाय त्याचा तरी मान राखावा
माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माझ्या हातात अजून निकालाची प्रत आलेली नाही, असे कारण सांगितले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, तीन वर्षे उलटली. तीन-चार न्यायाधीशांची कारकीर्द पूर्ण झाली तरीही न्यायालयात शिवसेनेसंबंधी निकाल रखडला आहे. कृषिमंत्री कोकाटेंबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे, याबाबतीत न्यायालयानेही तत्परता दाखवायला हवी होती. निकाल लागलाय तर किमान निकालाची प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी, अशी जर का कोणी मागणी केली तर त्यात गैर काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नार्वेकर न्यायालयाच्या प्रतीचा आदर, मानसन्मान राखणारे असतील तर शिवसेनेबाबत त्यांनी जो न्याय दिला तो न्याय कसा होऊ शकतो? असा सवालही त्यांनी केला.
शिवसेनेचा निकाल तीन वर्षे रखडलाय… मात्र माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. त्या निकालाचा तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान राखावा. – उद्धव ठाकरे
मर्सिडीज दिल्या तर पावत्या दाखवा – संजय राऊत
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही नीलम गोऱ्हे यांना यावेळी सुनावले. शिवसेनेच्या महिला आघाडीचा विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना चार वेळा आमदार केले. मग त्यांनी उद्धव ठाकरे यांना आठ मर्सिडीज दिल्यात का, असेल तर त्यांनी त्याच्या पावत्या घेऊन याव्यात, असे संजय राऊत म्हणाले. याप्रसंगी संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे आदी उपस्थित होते.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा शिवसेनेत प्रवेश
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा असे नाही, पण चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह आज योग्य दिशेने वळला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
किरण काळे यांच्यावर मोठी जबाबदारी देणार का, असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘किरण काळे यांच्यासारखे लढवय्ये कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. राज्यातच नव्हे तर देशात अंदाधुंद कारभार सुरू आहे, तो करणाऱ्यांना दूर करून पुन्हा एकदा खरे हिंदुत्व आणि खरे राष्ट्रीयत्व यांचे रक्षण करणे हीच त्यांची जबाबदारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अहिल्यानगर जिह्यातील एक महत्त्वाचा राजकीय कार्यकर्ता शिवसेनेत आला हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगत संजय राऊत यांनी यावेळी काळे यांच्याबद्दल माहिती दिली. लोकसभा निवडणुकीवेळी पेंद्रातील भाजप सरकारविरुद्ध ‘निर्भय बनो’ सभा विरोधकांनी घेतल्या होत्या. त्यातील सर्वात मोठी सभा काळे यांनी अहिल्यानगरमध्ये घेतली होती, असे खासदार राऊत यांनी सांगितले.
भाजपचे मुस्लिमप्रेम निवडणुकीपुरते…मी फोटोसह दाखले देऊ शकतो
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या बेगडी मुस्लिमप्रेमावरही टीका केली. ते म्हणाले की, ‘आज गाडगेबाबांचे स्मरण केले पाहिजे. धर्म जगायचा असतो सांगायचा नसतो, असे गाडगेबाबा नेहमी सांगायचे. गाडगेबाबांनी जी दशसूत्री सांगितली तो खरा धर्म. छत्रपती शिवाजी महाराजांनीही दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा असे शिकवलेले नाही. जे या देशाला आपले मानतात ते आपले आहेत. ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे त्या भाजपचे मुस्लिमप्रेम कसे आहे याचे मी फोटोसह दाखले देऊ शकतो. थोरले की धाकले बंधुबद्दल मोदींनी आपुलकीने ट्विट केले आहे. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे, त्यांचा धर्म देशाला चांगल्या दिशेने घेऊन जाईल असे वाटत नाही.’
निवडणुकीतील रेवड्या आता उघड्या पडल्या
निवडणूक काळात अनेक रेवड्या उडवल्या गेल्या. आता त्या रेवड्या उघड्या पडायला लागल्यात. जनतेची फसवणूक झाली आहे. लोकांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे क्षण आणून देण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.
काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.