
गुणवत्तेला डावलून वशिलेबाजीच्या जाळय़ात अडकत चाललेल्या महाराष्ट्राच्या कबड्डीचे पाऊल 71 व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच पकडले गेलेय. गेल्या तिन्ही राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱया महाराष्ट्राचे आव्हान पंजाबने उपउपांत्यपूर्व फेरीतच 35-26 असे संपुष्टात आणले. गेल्या दोन आठवडय़ांतच महाराष्ट्राच्या पुरुष संघाला सलग तिसऱयांदा पराभवाची झळ सोसावी लागल्याने महाराष्ट्राची वशिलेबाजी पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे.
एके काळ असा होती की, राष्ट्रीय कबड्डीवर महाराष्ट्राचा दबदबा असायचा. कोणताही संघ असो, महाराष्ट्राचे नाव ऐकल्यावर दोन पावलं मागे पडायची, पण गेल्या काही वर्षांत ही स्थिती वेगाने बदललीय. राज्यातील कबड्डी संघटकांनी जोरदार कबड्डी खेळणाऱया खेळाडूंऐवजी राजकीय हितचिंतकांच्या ओळखीच्या खेळाडूंची वर्णी लावताना गुणवत्तावान खेळाडूंना डावलण्याचा प्रकार सुरू केला आहे. गेल्या वर्षी अहिल्यानगर येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी हाच प्रकार घडला होता आणि आताही तोच प्रकार कायम ठेवण्याचे काम स्वताला कबड्डीचे सर्वेसर्वा समजत असलेल्या बाबुराव चांदेरेंनी ठेवला. त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या संघांना भोगावे लागलेत. आधी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या गटात बाद झाल्यानंतर बीच कबड्डीतही महाराष्ट्राचा पुरुष संघ साखळीतच बाद झाला.
या दोन अपयशानंतर महाराष्ट्राचे डोळे उघडतील अशी अपेक्षा होती. ओडिशाच्या कटकमध्ये झालेल्या स्पर्धेतही त्याची पुनरावृत्ती झाली. महाराष्ट्राच्या संघाचे बाद फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे. साखळीत दोन दुबळय़ा संघांना हरवल्यानंतर राज्याच्या खेळाडूंवर आनंदाचा माज चढला होता, जो पंजाबने उपउपांत्य फेरीतच उतरवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या संघात दमच दिसला नाही. संघात काही मोठी नावे होती, पण त्यांच्या खेळात जराही दम दिसला नाही. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे संघात कायम राहिलेल्या या खेळाडूंमुळे राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्राचा संघ उपांत्य फेरीत हरला होता आणि त्याला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले होते. दोन वर्षांपूर्वी रेल्वेविरुद्धच्या जेतेपदाच्या लढतीत महाराष्ट्र हरला आणि त्यांना उपविजेतेपदावर आपली तहान भागवावी लागली होती. 68 व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतही राज्याचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. यंदाची राज्य संघाची कामगिरी आणखीनच खालावली आहे. या पराभवानंतर संघात निवडलेल्या खेळाडूंचीच नव्हे तर प्रशिक्षकासह अन्य सपोर्टिंग स्टाफच्या निवडीबाबतही संघटनेला उत्तरे द्यावी लागणार आहेत.