
‘हायव्होल्टेज’, ‘महामुकाबला’, ‘क्रिकेटयुद्ध’, ‘धर्मयुद्ध’, ‘ब्लॉकबस्टर’ अशी अनेक विशेषणं लाभलेल्या सामन्यात हिंदुस्थानने पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानला दुबईतही तुडवलं. सर्व कामं बाजूला सारून बसलेल्या या सामन्यात ना व्होल्टेज हाय होतं ना मुकाबला महा वाटला, ना युद्ध रंगलं. पाकिस्तानचा बार अक्षरशः फुसका ठरला. विराट कोहलीच्या 51 व्या शतकासाठी लांबलेल्या सामन्यात हिंदुस्थानने 45 चेंडू राखून पाकिस्तानला धुतले आणि 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा सव्याज वचपा काढताना नॉकआऊट पंच मारला. आजच्या विजयामुळे हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडकही मारली आणि यजमान आणि गत चॅम्पियन्स पाकिस्तानच्या छातीत धडकीसुद्धा भरवली. या पराभवामुळे ते साखळीतच बाद होण्याच्या संकटात सापडले आहेत. आता केवळ त्यांना अल्लाहचा करिश्माच वाचवू शकतो.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातल्या हायब्रीड मॉडेलच्या सामन्याने आज पाकिस्तानात मातम पसरवले. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात न खेळण्याचा हिंदुस्थानचा निर्णय आणि त्यानंतर प्रचंड वादावादीनंतर हायब्रीड मॉडेलचा घातलेला घाट आज दुबईत रंगलाच नाही. जशी गर्दी व्हायला हवी, तशी झालीच नाही. पाकिस्तानचा संघ फारच दुबळा भासला. त्यामुळे हिंदुस्थानला विजयासाठी फार कष्ट करावे लागले नाही.
पाकिस्तानकडून मिळालेल्या 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला टॉप गिअरमध्ये सुरुवात करून दिली, मात्र 15 चेंडूंत 3 चौकार व एका षटकारासह 20 धावांची त्याची देखणी खेळी पाचव्या षटकातच संपुष्टात आली. शाहिन शाह आफ्रिदीने बुंध्यात टाकलेल्या यॉर्करवर रोहितचा त्रिफळा उडविला. मग शुभमन गिल व आलेल्या विराट कोहलीने धावफलकावर 100 धावा लावल्या, मात्र बांगलादेशविरुद्ध शतक ठोकणाऱया गिलला यावेळी अर्धशतकाने हुलकावणी दिली. अबरार अहमदने एका अप्रतिम चेंडूवर चकवत त्याच्या बेल्स उडविल्या.
शकील–रिझवानने सावरले
पाकिस्तानची सलामीची जोडी पहिल्या पॉवर प्लेमध्ये काहीच करु शकली नाही. फलकावर पाकिस्तानच्या 47 धावाच लागल्या होत्या आणि इमाम-उल-हक (10) आणि बाबर आझम (23) या दोन्ही सलामीवीरांना परतीचा मार्ग दाखवत हिंदुस्थानने दमदार सुरुवात केली होती. मात्र यानंतर सऊद शकील (62) आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने (46) अत्यंत सावध आणि संयमाने खेळ करत शतकी भागीदारी रचली. पाकिस्तानला दीडशतकी टप्पा गाठून दिल्यानंतर अक्षर पटेलने ही जोडी फोडण्यात यश मिळवले. त्याने रिझवानचा त्रिफळा उडवत हिंदुस्थानला तिसरे यश मिळवून दिले.
कुलदीपचा जलवा
संघातील स्थान अस्थिर असलेल्या कुलदीप यादवला आज अंतिम संघात स्थान लाभले आणि त्याने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची किमया संघव्यवस्थापनाला दाखवली. एकवेळ 2 बाद 151 अशा स्थितीत असलेल्या पाकिस्तानला पंडय़ा-पटेलने धक्का दिला. या धक्क्यानंतरही पाकिस्तानचा डाव काहीसा अडखळला होता. मात्र कुलदीपने सलग चेंडूंवर सलमान आगा आणि शाहिन शाह आफ्रिदीला बाद करत त्यांच्या धावांना रोखण्यात यश मिळवले. मग पुढच्याच षटकात त्याने नसीम शाहचाही अडथळा दूर केला. तरीही खुशदिल शाहने शेवटच्या हाणामारीच्या षटकात दोन षटकारांसह 38 धावा ठोकत पाकिस्तानचा आकडा कसाबसा 241 पर्यंत नेला. पाकिस्तानच्या या डावात केवळ शकीलच अर्धशतकी खेळी साकारू शकला. त्याने 76 चेंडूंत 5 चौकारांसह 62 धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडून कुलदीपने 40 धावांत 3, तर हार्दिक पंडय़ाने 2 बळी टिपले. हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजाने यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
कोहलीने मोडला आणखी एक विक्रम
विराट कोहली मैदानावर बॅट घेऊन उतरतो तेव्हा त्याच्या नावावर एखाद्या विक्रमाची नोंद होतेच, मात्र आज त्याने आपल्या एकदिवसीय शतकांच्या विक्रमात आणखी एका शतकाची भर घालत 51 वे एकदिवसीय शतक ठोकले. तसेच कोहलीने गेल्याच सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनच्या 156 एकदिवसीय झेलांची बरोबरी साधली होती आणि आज कुलदीप यादवच्या फिरकीवर नसीम शाहचा उडालेला झेल त्याने टिपत सर्वाधिक झेल टिपणारा हिंदुस्थानी क्षेत्ररक्षक म्हणूनही आपले नाव पहिल्या स्थानावर आणले. तसेच पाकिस्तानच्या डावाचा शेवट करताना खुशदिल शाहचा झेल टिपत त्याने आपला 158 वा झेलही टिपला. आता कोहलीपेक्षा अधिक झेल महेला जयवर्धने (218) आणि रिकी पॉण्टिंग (160) यांनी टिपले आहेत.
विराट–श्रेयसचे तुफान
100 धावांत 2 फलंदाज तंबूत परतल्यानंतर विराट कोहली व आलेला श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. या दोघांच्या तुफानात पाकिस्तानच्या गोलंदाजीचा पाचोळा बघायला मिळाला. या दोघांनी तिसऱया विकेटसाठी 128 चेंडूंत 114 धावांची भागीदारी केली. श्रेयसने 67 चेंडूंत 56 धावा करताना 5 चौकारांसह एक षटकार लगावला. खुशदिल शाहने श्रेयसला इमाम उल-हककरवी झेलबाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला हार्दिक पंडय़ा (6) एक चौकार मारून माघारी परतला. त्याला त्याला शाहिन आफ्रिदीने यष्टीमागे रिझवानकरवी झेलबाद केले. आता टीम इंडियाला विजयापेक्षा विराट कोहलीच्या शतकाची अधिक उत्सुकता लागली होती. अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून त्याने शतक पूर्ण करून हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटच्या 111 चेंडूंतील नाबाद 100 धावांच्या खेळीला 7 चौकारांचा साज होता.
शतक आणि विजयोत्सव
हिंदुस्थानचा संघ दुबळठय़ा पाकिस्तानचा धुव्वा उडवणार हे निश्चित होते. आजच्या हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघ्या हिंदुस्थानने विजयोत्सवाची तयारी वाया गेली नाही. विराट कोहलीने शतकी खेळी ठोकत हिंदुस्थानचा विजय आणि हिंदुस्थानींचा विजयोत्सव ब्लॉकबस्टर केला. आयसीसी स्पर्धेत ‘बाप, बाप होता है’ हे हिंदुस्थानी संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले. या हायव्होल्टेज सामन्याला थराराची किनार नसली तरी हिंदुस्थानी चाहत्यांनी जागोजागी जल्लोष साजरा केला. या विजयामुळे हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी पाकिस्तानचे आव्हान साखळीतच बाद होण्याची शक्यता निर्माण झाल्याने चाहते काहीसे निराशही झालेत. कारण 2017 ला पाकिस्तानला जेतेपदाच्या लढतीत हार सहन करावी लागली होती. त्या पराभवाचा बदला पाकिस्तानला अंतिम फेरीत हरवूनच घ्यावा, अशी इच्छा होती, पण ती आता पूर्ण होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये जल्लोष
हिंदुस्थानने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला येथे नागरिकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. शिट्टय़ा वाजवत आणि हिंदुस्थानचा ध्वज अभिमानाने फडकावत आनंदोत्सव साजरा केला. रस्तोरस्ती जणू दिवाळीच साजरी करण्यात आली. मोठय़ा संख्येने नागरिकांनी घराबाहेर पडून हिंदुस्थानच्या जबरदस्त कामगिरीचा विजयोत्सव साजरा केला.
शमीचे 11 चेंडूंचे वाईड षटक
शमीने आपल्या पहिल्याच षटकांत चक्क पाच वाइड चेंडू फेकण्याचा वाईट पराक्रम केला. सामन्याच्या पहिल्याच षटकात त्याने इमाम-उल-हकला चक्क अकरा चेंडू खेळवले. इमामने शमीच्या एका चेंडूवर धाव काढली नाही. मात्र शमीने या षटकात दोनदा सलग वाइड चेंडू टाकले. त्यामुळे शमीचे पहिले षटक दोन षटकांसारखेच झाले. शमीला आपल्या गोलंदाजीवर नियंत्रणच ठेवता येत नव्हते. त्यामुळे तो 11 चेंडूंचे षटक फेकणारा तिसरा हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. बांगलादेशचा हसीबुल हुसेन आणि झिम्बाब्वेचा तीनाशे पन्यानगारा यांनी 13 चेंडूंचे षटक टाकत विश्वविक्रम केला आहे. जो शमीला मोडता आला नाही.