
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी : अनुवाद हे दोन भाषा आणि संस्पृतीच्या देवाणघेवांचे काम करणारे दूत आहेत. पण अनुवादाला आज दुय्यम स्थान दिले जाते. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते. त्यामुळे अनुवाद दुय्यम नाही तर अनुसूर्जनाची निर्मिती करणारा स्वतंत्र लेखक आहे, भाषांतर करताना नवनवीन शब्दांचा वापर होणे गरजेचे आहे असे, मत तज्ञांनी व्यक्त केले.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे दिल्ली येथील तालकटोरा मैदानात आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘ अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत‘ या विषयावरील आयोजित परिसंवादाचे आज आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंचावर आयोजित चर्चासत्रात प्रफुल्ल शिलेदार अध्यक्षस्थानी होते. डॉ पृथ्वीराज तौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, विजय नाईक, महामंडळ प्रतिनिधी किरण सागर यांचा सहभाग होता. उत्तम अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जाते त्यातूनच ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते, असे विजय नाईक म्हणाले. साहित्यकृती विश्वव्यापी होण्यात अनुवादित साहित्याचा मोठा वाटा आहे. अनुवादकाला भाषेची जाण असणे आवश्यक आहे. अनुवादाच्या प्रक्रियेत लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये सतत चर्चा सुरू राहिली पाहिजे, असे सुनीता डागा म्हणाल्या.
परिसंवादाचा समारोप करताना प्रफुल्ल शिलेदार म्हणाले, प्रत्येक संमेलनात अनुवादित साहित्य या विषयावर चर्चा होणे तसेच अनुवादाच्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. अनुवादित साहित्यासंदर्भात शासकीय स्तरावरही स्वतंत्र मंडळ व समिती तयार व्हायला हवी.