
पुणे-सातारा महामार्गाचे काम 2010 सालापासून सुरू असून अद्याप पूर्ण न झाल्याने वाहनचालकांना वाहतूककोंडी तसेच खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना आणखी तीन महिने खड्डय़ातून प्रवास करावा लागणार असून अर्धवट स्थितीत असलेल्या महामार्गाचे काम मे 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे अशी हमी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज हायकोर्टात दिली.
पुणे-सातारा महामार्ग हा पुढे कोल्हापूरमार्गे थेट मंगलोरला जातो. या महामार्गाने कोल्हापूरमार्गे कोकणातही पोहोचता येते. मात्र 2010 सालापासून या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. याचा फटका वाहनचालकांना बसत असून किशोर मनसुखाणी यांनी अॅड. यतीन मालवणकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून वाहनचालकांना खड्डेमय प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे महामार्गावरील 1.2 किमीचा टप्प्याचे काम सुरू असून ते मे 2025 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तर दीर्घकालीन सुधारणा ऑगस्ट 2025 पर्यंत करणार असल्याची माहिती दिली. न्यायालयाने याची दखल घेत सदर याचिका निकाली काढली.