‘डंकी मार्ग’ बनला मृत्यूचा मार्ग!  ट्रम्प यांच्या निर्णयाने एजंटला धास्ती; मोहालीतील तरुणाचा वाटेतच मृत्यू

डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेला ‘डंकी मार्ग’ वापरून जाणाऱ्यांचे धाबे दणाणले. अशातच पंजाबमधील मोहाली येथील तरुणाचा अवैधरीत्या अमेरिकेत जात असताना वाटेतच मृत्यू झाला आहे. रणदीप सिंग (24) असे मृताचे नाव आहे. हरयाणातील अंबाली येथील एजंटने त्याला कॅनडामार्गे डंकी मार्गाने अमेरिकेत नेण्याचे स्वप्न दाखवले होते. यासाठी मृत तरुणाला तब्बल 43.50 लाख रुपये मोजावे लागले. रणदीप प्रथम व्हिएतनाममध्ये आणि त्यानंतर पंबोडियामध्ये आठ महिने अडकून राहिला. बराच काळ अडकून राहिल्यामुळे त्याच्या पायाला पह्ड आले आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे संसर्ग वाढला आणि त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांना मृतदेहाची प्रतीक्षा

मृत रणदीपचा थोरला भाऊ रवीने सांगितले की, त्यांचे आईवडील रोजंदारीवर काम करतात. रणदीपला कॅनडामार्गे अमेरिकेला जायचे होते. मात्र एजंट त्याला कॅनडाला नेऊ शकला नाही. आम्ही शेवटच्या वेळी रणदीपला पह्न केला असता त्याने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. शुक्रवारी त्याला ऑनलाइन 20 हजार रुपयेही पाठवण्यात आले. परंतु शनिवारी पहाटे त्याच्या निधनाची बातमी आली. त्याचा जीव वाचवू शकलो नाही, किमान मृतदेह तरी घरी आणावा अशी आमची मागणी आहे.