
भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी पटेल यांचे प्रचंड कौतुक केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने पटेल यांनाही थार भेट द्या अशी मागणी केली. यावर हो… हा व्यक्ती थारच्या लायकीचा नक्कीच आहे, अशी प्रतिक्रिया महिंद्रा यांनी दिली. त्यामुळे आनंद महिंद्रा पटेल यांना थार कार भेट देणार का? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.
रुबी ढल्ला कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या रेसमधून बाहेर
मूळच्या हिंदुस्थानी वंशाच्या रुबी ढल्ला या कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. लिबरल पार्टीने त्यांना या पदासाठी अयोग्य घोषित केले. त्यामुळे त्या कॅनडाच्या पंतप्रधान बनण्याची शक्यता मावळली आहे. पक्षाने मतदान समितीकडे ढल्ला या पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत की नाही याची पडताळणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार ढल्ला यांनी निवडणूक खर्चासह एकूण 10 नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबतची माहिती लिबरल पार्टीचे नॅशनल डायरेक्टर आजम इस्माइल यांनी दिली.
रॉयल एनफिल्डची पहिली ई–बाईक हिंदुस्थानात
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक पंपनी रॉयल एनफिल्डने हिंदुस्थानच्या बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक आणली आहे. फ्लाइंग फ्ली सी6 ची अपेक्षित किंमत 4.5 लाख रुपये एवढी आहे. पंपनीने इटलीतील मिलान येथील ऑटोमोटिव्ह शो ईआयसीएमए-2024 मध्ये ती सादर केली होती. विशेष म्हणजे फ्लाइंग फ्ली मॉडेलपासून प्रेरित होऊन या ई-बाईकची रचना करण्यात आली आहे. विविध वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असलेली ही बाईक ग्राहकांचे लक्ष वेधत आहे.
आसाम रायफल्स भरतीसाठी अर्ज सुरू
आसाम रायफल्सने टेक्निकल आणि ट्रेड्समन पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार 22 मार्च 2025 पर्यंत आसाम रायफल्सच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. इलेक्ट्रिकल आणि मेपॅनिकल पदांसाठी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार इतर पदांसाठी अर्ज करू शकतात. 18 ते 30 वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. आसाम रायफल्सच्या www.assamrifles.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.
जम्मूत तुफान बर्फवृष्टी; 15 राज्यांत पावसाचा अलर्ट
देशभरात पूर्वेकडील तब्बल 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या सलग तिसऱ्या दिवशी 10 राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे, तर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड येथे ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असून डोडा, भद्रवाह, राजौरीसह विविध भागांत व्हाइट वंडर पाहायला मिळत आहे. 24 फेब्रुवारी रोजी जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथे पाऊस आणि तुफान बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.