
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्तानचा 6 गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे उपांत्य फोरीतील टीम इंडियाचे स्थान निश्चित झाले आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विराटने चौकार ठोकत 51 वं एकदिवसीय शतक पूर्ण केले. तसेच श्रेयस अय्यर, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पाकिस्तानचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे.
नाणेफेक जिंकून पाकिस्ताना कर्णधार मोहम्मद रिझवानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खोडून काढला. अचूक आणि भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली. मधल्या फळीत कर्णधार रिझवान (46 धावा) आणि सौद शखील (62 धावा) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना फार काळ गोलंदाजांनी मैदानावर टिकू दिले नाही. त्यानंतर खुशदिल शाह (38 धावा) याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानला सर्वगडी बाद 241 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याने 2 विकेट घेतल्या तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.