विज्ञान – रंजन – महावणवा

>> विनायक

आमच्या लहानपणीचा एक खेळ. गोलाकार फिरत म्हणायचं, ‘डोंगराला आग लागली पळा पळा.’ मग मध्येच एका संकेताने थांबायचं. आता असा हा ‘खेळ’ सुरू कसा झाला ते ठावूक नाही, पण त्याला बहुधा पूर्वी गावाबाहेरच्या डोंगरांवर उन्हाळ्यात आपोआप पेटणाऱ्या वणव्यांची पार्श्वभूमी असावी. अगदी महानगरांच्या परिसरातही असलेल्या टेकड्यांवरच्या झाडाझुडपात पूर्वी केव्हा तरी असे वणवे दिसायचे. त्या जंगलांची जागा काँक्रिटच्या जंगलांनी घेतली आणि काळाच्या ओघात तो खेळही बंद पडला.

परंतु नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अमेरिकेसारख्या संपन्न देशातल्याही श्रीमंत कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस भागात भीषण अग्नितांडव सुरू झालं. एक-दोन-चार नव्हे तर पंधरवडा उलटला तरी हा अग्निकल्लोळ शमल्याचं चिन्ह नव्हतंच, उलट तो सैरावैरा वाढत गेला. जगप्रसिद्ध ‘हॉलीवूड हिल’ भस्मसात झाली. नामांकित अभिनेत्यांची आलिशान घरं या अग्निहोत्रात जळून खाक झाली. लाखो लोकांना जळती घरं आणि असंख्य आठवणी अग्नीच्या स्वाधीन होताना हताश नजरेने पाहत, दूर पळ काढावा लागला.

जगातल्या सर्वात प्रगत देशाची निसर्गाने केलेली ही होरपळ अभूतपूर्व होती. तशा या भागातल्या जंगलात आगी लागतातच. त्यामुळे अमेरिकेच्या (यूएस) दक्षिणेला असलेलं अॅमेझॉनचं अरण्य आणि कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग येथे आगीची धग वारंवार जाणवते. या वेळी मात्र ‘डेव्हिल्स विंड्स’ किंवा राक्षसी वाऱ्यांनी कहर केला. अनेक ठिकाणी आग सुरू झाली आणि आसपासचा प्रदेश जाळत सुटली. या साऱ्या नैसर्गिक ‘खेळा’चं वैज्ञानिक मर्म सांगता येईल, पण उभं शहर भस्मसात होण्यात रंजन कसलं? उदास करणारं ‘भंजन’ तेवढं शिल्लक राहिलं!

त्यातला विज्ञानाचा भाग मात्र थोडक्यात जाणून घेऊ. वनात वणवा पेटणं ही कोरड्या, शुष्क हवामानातली जगभरच्या अरण्यांमधली नैसर्गिक क्रिया. जलशून्य वातावरणात वाऱ्यांच्या घुसळणीने काडीला काडी घासून अग्निकण निर्माण होणं नवं नाही. पूर्वी यज्ञीय अग्नी असाच विशिष्ट काष्ठ-घर्षणातून निर्माण केला जायचा. मात्र तो उभ्या अरण्यात निर्माण झाला आणि वेगाने पसरला तर हाहाकारच उडणार. हिंदुस्थानात ज्या काळात सत्तर टक्क्यांहून अधिक भाग जंगलांनी व्यापलेला होता, त्या काळातल्या ऐतिहासिक आगींचे उल्लेख अनेक कथानकांमध्ये सापडतात. महाभारतातील धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर या वृद्ध ज्येष्ठांचा अंत वानप्रस्थातील अग्निप्रलयातच झाल्याची कथा आहे.

त्यामुळे जंगलातील आग माणसांना नवी नाही, मात्र ती एखाद्या अग्निवादळाचं रूप घेऊन पृथ्वीवरचं एखादं प्रगत नगर बघता-बघता भस्मसात करू पाहाते तेव्हा ती दृश्यंही भयावह वाटतात. मग प्रत्यक्षात ज्यांना या आगीच्या झळा लागल्या त्यांची अवस्था काय झाली असेल.

लॉस एंजेलिस शहरावर सुरू झालेला अग्निवर्षाव पुढच्या चार दिवसांतच 18 हजार एकरांवर पसरला. मुंबईतला कुलाबा ते दादर एवढ्या आकाराचा लॉस एंजेलिसमधला भूभाग या आगीने गिळंकृत केला. जे सपाट्यात येईल त्याची केवळ राख केली. हजारो घरं, गाड्या आणि सर्व प्रकारची मालमत्ता. त्यातही अमेरिकेतली घरं लाकडी असल्याने अगदी अलगद आगीच्या मुखात ‘स्वाहा’ झाली. आगीचं चक्रीवादळच घोंघावू लागलं आणि पॅलिसेड्स, सनसेट, इटन, वुडली, ऑसिवाज, हर्स्ट आणि लिडिया सात ठिकाणी आगीची ‘केंद्रकं’ तयार झाली.

का झाला हा उत्पात? अचानक इतके वणवे कसे पेटले? त्याला एक कारण म्हणजे, अतिशय कोरडी, शुष्क हवा, ताशी शंभराहून जास्त किलोमीटर वेगाने वाहणारे वारे! त्यांना सॅन्टा अॅन्ना विंड्स असं म्हणतात. त्यातच गेल्या दहा वर्षांत या भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमिनीतही ओलावा नव्हता आणि झाडं-पानं पार सुकून गेली होती. आगीच्या ठिणगीला ‘सरपण’ मिळायला आणखी काय हवं? त्यातच गेला उन्हाळा अधिक तीव्र ठरल्याने वातावरण अग्निप्रलयाला पोषण बनलं. शिवाय घरंसुद्धा लाकडाची. म्हटलं तर सगळे ‘कु’योग एकदम जुळून आले आणि एका अनाम ठिणगीने घात केला. हिवाळ्यात ऊबदार म्हणून बांधलेली लाकडी घरं, कर्दनकाळ ठरली. कापरासारखी जुळून गेली.

अर्थात तिथे हे पहिल्यांदाच घडलंय असं नाही. 2022 मध्येही असंच अग्नितांडव या परिसराने अनुभवलं होतं. त्याला वाढत्या जागतिक तापमानातही दिवसेंदिवस किती हातभार लागतोय, कोणास ठाऊक! अशा ठरावीक ‘तप्त’ दिवसांची नोंद ‘फायर वेदर’ दिवस म्हणून केली जाते. त्या काळात वनातील वणवे पेटण्याची शक्यता गृहीत धरण्यात येते. ‘फायर फायटिंग’ची सारी यंत्रणा सज्ज होते.

या वेळी ही यंत्रणा सज्ज होतीच. पण यंत्रणेच्या अपेक्षेच्या कैक पटींनी आगीचं रूप भयानक होतं. म्हणून हेलिकॉप्टरमधून सतत केला जाणारा पाण्याचा मारा आणि अग्निरोधक धुराचा फवाराही आग शमवण्यात अयशस्वी ठरताना दिसला. अमेरिकेत फोन करून एकाला विचारलं तर आग त्याच्या घरापासून काही मैलांवरच होती. राखेची काजळी शहरभर पसरायला लागली होती. केवळ लॉस एंजेलिसवासीयांचीच नव्हे तर जगाचं काळीज करपवणारी ही होरपळ. ‘प्रगत’ जगाने अजून खूप सजग राहायला हवं असल्याचाच तप्त संदेश त्यातून मिळतोय. असे अग्निप्रलय काय किंवा त्सुनामी-भूकंप काय, आपले हात ते रोखायला तोकडे पडतायत एवढं खरं. प्रयत्न हेच त्यावरचं उत्तर.