पोलिसांच्या चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा? वाल्मीक कराड प्रकरणी अंजली दमानिया यांचा सवाल

वाल्मीक कराड प्रकरणी बालाजी तांदळे यांना पोलिसांनीच लेखी आदेश दिले होते. आरोपींना शोधा आणि आरोपी सापडल्यास संपर्क साधा असे पोलिसांनी म्हटले होते. ही बाब अतिशय गंभीर आहे, पोलिसांच्या या चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

एक्सवर पोस्ट करून दमानिया म्हणाल्या की, हे अतिशय गंभीर आहे. यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलिस चौकशीवर? तुमची गाडी घेऊन आरोपीला शोधा आणि आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा. असा आदेश स्कॉर्पिओ नंबर H44AD0727 चे मालक यांना बीड पोलिसांनी दिला. ह्या स्कॉर्पिओ चे मालक कराडचे मित्र बालाजी तांदळे. तपास मुद्दाम भलत्याच दिशेला भरकटत नेण्यासाठी आणि कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले .

हा राजकीय दबाव कुणी टाकला असेल हे वेगळे सांगण्याची गरज आहे का ? असे म्हणत एसपी अविनाश बर्फाळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन गोसावी आणि भागवत शेलार या पोलीस कर्मचाऱ्यांना बरखास्त करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तसेच ह्या सगळ्यांना बालाजी तांदळे सकट सहआरोपी करा असेही दमानिया म्हणाल्या.