
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. तर आता मराठा समाजही आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा समाज संघटनांची बैठक पार पडली, या बैठकीला मराठा समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पुन्हा एकदा सरकारला इशारा देण्यात आला आहे. या बैठकीमध्ये राज्यातील तब्बल 42 मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या.
मराठा समाजाच्या परिषदेसाठी दहा मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू, असा इशारा मराठा संघटनांनी राज्य सरकारला दिला आहे. लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात सरकारसोबत चर्चेला प्राधान्य दिलं जाईल, मात्र दखल न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग मोकळा असेल, असा थेट इशारा सरकारला देण्यात आला.
अद्यापही मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. तरओबीसी समाजातून या मागणीला विरोध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा गुंता वाढला आहे. आता मराठा समाजानं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धारही करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.