
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता या सामन्यात रोहित ब्रिगेड प्रथम क्षेत्ररक्षणासाठी उतरली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. नाणेफेक पाकिस्तानने जिंकल्यानंतर तब्बल 12 वेळा सलग नाणेफेक गमावणारा संघ असा नकोसा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक जिंकू शकला नाही. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही टीम इंडियाला नाणेफेकीची साथ मिळाली नाही. 2023 च्या क्रिकेट फायनलनंतर टीम इंडियाने सलग 12 वेळा नाणेफेक गमावली आहे. जो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील कोणत्याही संघाचा नकोसा विक्रम आहे.
या नकोशा विक्रमात टीम इंडियाने नेदरलँड्सचा मागे सोडले आहे. मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 या काळात दरम्यान नेदरलँड्सने सलग 11 वेळा नाणेफेक गमावली. टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय सामन्यात 2023 च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध टॉस जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाने सलग 12 वेळा नाणेफेक गमावली आहे.
नाणेफेक गामावल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, नाणेफेक गमावल्यामुळे सामन्यात काहीही फरक पडत नाही. त्यांनी नाणेफेक जिंकली म्हणून आपण प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. आमच्याकडे फलंदाजीत अनुभवी संघ आहे. तसेच गोलंदाजीसाठी खेळपट्टीप्रमाणे आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. गोलंदाजी आणि फलंदाजीत उत्तम कामगिरी करण्यावर आमचा भर आहे, असे त्याने सांगितले.