
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले आहे का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच टिनपाट निमंत्रकांकडून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर होतोय अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यात संजय राऊत म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (98वे) दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
उषा तांबे यांना खुले पत्र!
@PawarSpeaks
@supriya_sule
@samant_uday
@rajivkhandekar pic.twitter.com/SjUz8bBvod— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2025
दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
तसेच नीलम गोन्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे असेही संजय राऊत म्हणाले.