
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने टेस्लाचे सर्वेसर्वा अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील यूएस डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने हिंदुस्थानात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी देण्यात येणारे 21 दशलक्ष डॉलर्सचे अनुदान रद्द करण्याची घोषणा केल्याने हिंदुस्थान आणि अमेरिकेत राजकीय वादळ उठले आहे. याबाबत भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. आता या वादात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे.
या निर्णयाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठराखण करत हिंदुस्थानातील मतदाराची संख्या वाढवण्यासाठी अमेरिकेचा निधी का…असा सवाल उपस्थित केला होत. त्यानंतर सलग चार दिवस त्यांनी हा मुद्दा उचलून धरत राजकीय वाद आणखी तीव्र केला आहे. मात्र. ट्रम्प यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नसल्याचे वॉशिंग्टन पोस्टने स्पष्ट करत ट्रम्प यांच्या वक्तव्याची हवाच काढून टाकली.
यानंतरही ट्रम्प यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत हिंदुस्थानला 21 दशलक्ष कोटी डॉलर्स दिल्याचे विधान केले. त्यानंतर काँग्रेसह विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला घेरले आहे. आता या वादात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेत थेट पंतप्रधान मोदी यांना इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेकडून मतदान वाढवण्यासाठी 21 दशलक्ष डॉलर्सचा निधी आला नाही, असे स्पष्ट करावे. तसेच निधी आला असल्यास त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे. ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यात तथ्य नसल्यास अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना मानहानीची नोटीस पाठवावी, मोदी यांनी याबाबत उत्तर दिले नाही तर आपण जनहितार्थ याचिका दाखल करत मोदींना कारणे दाखवा नोटीस पाठवू आणि न्यायालयात फौजदारी खटला दाखल करू, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या या इशाऱ्यामुळे या मुद्द्यावरील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.