24 ते 27 फेब्रुवारी, 3 ते 6 मार्च जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद; सकाळी 8 पासून सायंकाळी 6 पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक

महामार्गाची दुरुस्ती आणि पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी जुन्या कसारा घाटात सहा दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक दोन टप्प्यात असल्याने येत्या 24 ते 27 फेब्रुवारी आणि 3 ते 6 मार्च दरम्यान घाट वाहतुकीसाठी सकाळी 8 पासून सायंकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रॅफिक ब्लॉकच्या कालावधीत मुंबईकडून नाशिक दिशेने जाणाऱ्या वाहनांना कसारा घाटातील नवीन मार्गाने प्रवास करता येणार आहे.

जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन कसारा घाटात वाहतूककोंडीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी कसारा घाटातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी

जुना कसारा घाट दुरुस्तीदरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. ट्रॅफिक ब्लॉकच्या कालावधीत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्वच अवजड वाहनांची वाहतूक मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून वळवण्यात आली आहे. प्रवासी आणि वाहनचालकांच्या मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस कसारा घाटात तैनात राहणार आहेत.