
अंबोली हिंदू स्मशानभूमी सुरू करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना वर्सोवा विधानसभेचे उप विभागप्रमुख प्रसाद आयरे यांनी महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार आणि के-पश्चिम वॉर्ड अधिकारी चक्रपाणी अळे यांची भेट घेतली. ही स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली 1 डिसेंबर 2024 पासून बंद आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी रुग्णवाहिका अवाजवी शुल्क आकारत असल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून प्रशासनाने मोफत शववाहिनी सेवा तत्काळ सुरू करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
तसेच सी 1 वर्गाशिवायच्या क्षेत्रात किमान 50 टक्के क्षमतेने स्मशानभूमी सुरू ठेवावी आणि दोन्ही सीएनजी चिता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळू शकेल. या बैठकीला विभाग संघटक अनिता बागवे, संजय कदम, संजीवनी घोसाळकर, दयानंद कड्डी, उदय महाले तसेच अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून आवश्यक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.