
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील कोर्टाने 1995च्या एका प्रकरणात दोन वर्षांची पैद आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होऊ शकते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आमदार सुनील केदार यांना शिक्षा ठोठावल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची आमदारकी रद्द झाली होती. पण माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे याच न्यायाने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले की, न्यायालयाने त्यांना ठोठावलेल्या शिक्षेची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त होताच अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाईल. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत माणिकराव कोकाटेंच्या विरोधात कारवाई होईल असे दिसून येत आहे.