डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ातील त्रुटी दूर करा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल संघर्ष समितीची मागणी

दादरच्या इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या पुतळय़ात काही त्रुटी असून त्यात आवश्यक ते बदल करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल संघर्ष समितीने केली आहे. पुतळय़ातील त्रुटी दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. गाझियाबादमधील राम सुतार यांच्या वर्पशॉपमध्ये हा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. हा पुतळा उभारण्यापूर्वी त्याचे छोटय़ा आकाराचे मॉडेल आंबेडकरी समाजाच्या नेत्यांना दाखवण्यात आले. त्यावेळी काही बदल सुचवले होते, मात्र समाजकल्याण विभागाने यातील त्रुटी दुरुस्त न करता  आंबेडकरी नेत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेनेचे पक्ष संघटक विलास रुपवते यांनी केला आहे.

13 ऑगस्ट 2024 रोजी शिवसेना पक्ष संघटक विलास रुपवते, कामगार नेते रमेश जाधव, समाजसेवक प्रतीक कांबळे, भीम आर्मी राष्ट्रीय नेते अशोक कांबळे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुतळय़ातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. 17 फेब्रुवारीला पुन्हा एमएमआरडीएचे आयुक्त विक्रमपुमार यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीनंतर पॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि सचिव हर्षवर्धन कांबळे तडकाफडकी पुतळय़ाची पाहणी करण्यासाठी गाजियाबादला गेले.

 काय आहेत मागण्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रमाणबद्ध असावा, पुतळय़ाचा चेहरा हुबेहूब असावा, डॉ. आंबेडकरांच्या पेहरावाची विशिष्ट शैली होती, मात्र पुतळय़ातील पेहरावात मोठी तफावत आहे ती दूर करावी, डॉ. आंबेडकर यांच्या उजव्या हातातील बोट हे सरळ असावे, असे बदल संघटनेने एमएमआरडीएला सुचविले आहेत.