
विक्रोळीच्या संक्रमण शिबिरातील 11 गाळ्यांच्या वाटपाबाबत आरोप करत एका महिलेने गेल्या आठवडय़ात म्हाडा भवनात नोटा उधळून अनोखे आंदोलन केले होते. याची गंभीर दखल म्हाडाने घेतली आहे. संबंधित 11 अर्जदारांना पात्रता निश्चितीसाठी संधी देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून 27 फेब्रुवारीला सुनावणी घेतली जाणार आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहावे लागणार आहे.
गेल्या आठवडय़ात आंदोलक महिलेने म्हाडा मुख्यालयातील एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये नोटा उधळल्या होत्या. आंदोलक महिलेने विक्रोळीच्या संक्रमण शिबिरातील 11 घरांच्या वाटपाबाबत आरोप केले होते. त्यानंतर संक्रमण शिबिरातील गाळेवाटपाच्या चौकशीसाठी म्हाडाने समिती गठीत केली. या समितीने संक्रमण गाळे वाटपसंबंधी 20 वर्षांपासून रखडलेल्या प्रकरणातील 11 अर्जदारांना पात्रता निश्चितीसाठी संधी देण्याचा निर्णय घेतला असून सुनावणी आयोजित केली आहे.
पात्रता निश्चितीनंतर गाळेवाटपाचा निर्णय
इमारत दुरुस्ती मंडळाचे उपमुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने पात्रता निश्चिती करून संक्रमण गाळे वाटपसंबंधीचा तपशीलवार अहवाल समिती सादर करणार आहे. 11 अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर संक्रमण गाळे वाटपासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.