कोस्टल रोडवर तडे–भेगा गेलेल्या भागाचे काम नव्याने; पालिकेचा आदेश; कंत्राटदाराकडून काम 

मुंबई महानगरपालिकेने 14 हजार कोटी खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडला भेगा-तडे गेल्यामुळे  आता संपूर्ण भागाचे नव्याने काम करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराला आदेश देण्यात आले असून शुक्रवारी रात्रीपासूनच हे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेने रस्त्याच्या भेगांना तांत्रिक कारण असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता पुन्हा काम केले जात असल्याने पालिकेचा दावा पह्ल ठरला आहे.

मुंबईकरांचे इंधन आणि वेळ वाचवून दक्षिण मुंबईतून उपनगरापर्यंत अवघ्या 12 मिनिटांत नेणाऱ्या महापालिकेच्या कोस्टल रोडला तडे गेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे प्रसारमाध्यमांमधूनही पालिकेच्या कामावर जोरदार टीका करण्यात येत होती. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील  निकृष्ट कामाबद्दल पालिकेवर टीका केली होती. त्यामुळे धावपळ उडालेल्या पालिकेने तांत्रिक कारण देताना  डांबरीकरणाचे सांधे रुंद होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी आणि पावसाळय़ात निर्माण होणारे खड्डे रोखण्यासाठी अस्फाल्ट टाकल्याचे म्हटले होते. मात्र आता हे काम नव्याने करण्यात येत आहे.

दोन दिवसांत काम पूर्ण

– कोस्टल आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गावरून जात आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रात्रीच्या वेळी काम करण्यात येत आहे. यामध्ये खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकला जात असून नव्याने बनवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, दोन ते चार दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

असे होतेय काम…

 मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक असा एकूण 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. या कोस्टल रोडमुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 9 ते 10 मिनिटांत होणार असून वेळेची 70 टक्के, तर इंधनाची 34 टक्के बचत होणार आहे.

कोस्टल रोडवरील हाजी अली मार्गावरील उड्डाणपुलावर हे तडे पडले असून ते मास्टिक डांबराने बुजवण्यात आले आहेत. मात्र, ते वेडय़ावाकडय़ा पद्धतीने बुजवल्यामुळे असमतोल निर्माण झाला असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचेही या व्हिडीओतून निदर्शनास होते. त्यामुळे आता हे काम नव्याने करण्यात येत आहे.