
रोल मॉडल असल्याची बतावणी करणाऱ्या गुजरातवर तब्बल चार लाख कोटींचे कर्ज आहे. त्यानुसार तेथील प्रत्येक नागरिकावर 66 हजार रुपयांचे ओझे आहे. गुजरात विधिमंडळानेच ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे.
काँग्रेस आमदार शैलेश परमार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गुजरातमधील भाजप सरकारने कर्जाचा तपशील सादर केला. विकासाच्या नावाखाली भाजप गुजरातला कर्जबाजारी करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. धक्कादायक बाब म्हणजे कर्जाचे व्याज म्हणून दिलेल्या रकमेवरदेखील संशय व्यक्त केला जात आहे. 2022-23 मध्ये व्याजाचे 23 हजार 442 कोटी देण्यात आले होते, तर मुख्य कर्जाच्या रकमेचे 22 हजार 159 कोटी देण्यात आले. 2023-24 या वर्षात व्याजाचे 25 हजार 212 कोटी तर मुख्य रकमेचे 26 हजार 149 कोटी देण्यात आले. ही वाढीव रक्कम संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
एका वर्षात दुप्पट कर्ज घेतले
गुजरात सरकारने 2022-23 मध्ये वित्त संस्थेकडून 3 हजार 463 कोटी रुपयांचे कर्ज घेतले, तर 2023-24 मध्ये सात हजार कोटींचे कर्ज घेतले. एका वर्षात गुजरातच्या भाजप सरकारने दुप्पट कर्ज घेतले.
‘कर्ज घ्या आणि तूप प्या’ने बुडवले
‘कर्ज घ्या आणि तूप प्या’ असे गुजरात सरकारचे धोरण आहे. या धोरणाने नागरिकांवरील आर्थिक बोजा वाढत चालला आहे, असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी केला.