
जिल्हय़ातील पोलीस यंत्रणा कराड गँगची बटीक आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे पोलीसच नष्ट करत असल्याचा खळबळजनक आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला. वाल्मीक कराडच्या मिठाला जागणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना बीडमधून हाकला, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. सोमवारपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास अन्नत्याग आंदोलन कोणत्याही क्षणी सुरू करण्यात येईल, असा ठाम निर्धारही ग्रामस्थांनी बोलून दाखवला.
बीडमधील अराजकाचे धनी असलेले धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबासह ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. बीड जिल्हा पोलीस यंत्रणेतील अनेक अधिकारी वाल्मीक कराडचे चाकर आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांकडूनच नष्ट करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
प्रशांत महाजन केज पोलीस ठाण्यात काय करतात?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मुख्यालयात हलवण्यात आले. मात्र हे महाजन केज पोलीस ठाण्यात येतात, तासन् तास संगणक हाताळतात. दुसरे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील हे देखील पोलीस ठाण्यात पडीक असतात. हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेल्यानंतर केज पोलिसांना एकही पुरावा सापडलेला नाही. जे काही पुरावे गोळा झाले आहेत ते जनतेमधून उपलब्ध झाले आहेत. मुळात पोलीस कराडच्या मिठाला जागत असल्याचा स्पष्ट आरोप ग्रामस्थांनी केला.
कराडची ‘टीम बी’ भीती दाखवते…
वाल्मीक कराड गँग जेलात गेल्यानंतर लगेचच दुसरी बी टीम तयार झाली असून मस्साजोगच्या ग्रामस्थांना भीती दाखवण्याचे काम हे लोक करत आहेत. देशमुख कुटुंबालाही या ‘टीम बी’कडून धमकी देण्यात आली. यासंदर्भात पोलिसांना सूचना देण्यात आली. परंतु पोलीस आरोपींचेच मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत.
परळीत आमदार धस यांना काळे झेंडे
देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सुरेश धस केज पोलीस ठाण्यात गेले. काही सूचना दिल्या. तेथून ते परळीत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले. त्यानंतर बुडालेल्या राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना भेटत असताना मुंडे समर्थकांनी आमदार धस यांना काळे झेंडे दाखवले. महादेव मुंडे हत्या प्रकरणात भास्कर केंद्रे, सचिन सानप आणि गोविंद भताने या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.