काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ, FBI संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला

हिंदुस्थानी वंशाचे काश पटेल यांनी शनिवारी भगवद्गीतेवर हात ठेवून अमेरिकन तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चे संचालक म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. पटेल हे आतापर्यंतचे सर्वात सक्षम एफबीआय संचालक म्हणून नामांकित होतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांचे कौतुक केले. काश पटेल हे एफबीआयचे नेतृत्व करणारे नववे अधिकारी आहेत. अमेरिकन सिनेटमध्ये पटेल यांच्या बाजुने 51 तर विरोधात 49 मते पडली होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांव्यतिरिक्त, दोन रिपब्लिकन खासदार सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की डोमात्र यांनी पटेल यांच्या विरोधात मतदान केले होते. काश पटेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’ च्या कामकाजावरही देखरेख करतात. 2022 च्या फिफा विश्वचषकादरम्यान पटेल यांनी कतारसाठी सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केले.

पटेल मूळचे गुजराती

काश पटेल हे मूळचे गुजरातमधील आहेत. 2019 मध्ये ट्रम्प प्रशासनात सामील झाल्यानंतर काश पटेल यशाच्या शिडी चढत राहिले. ते ट्रम्प प्रशासनात फक्त 1 वर्ष 8 महिने राहिले, पण सर्वांच्या नजरेत आले. काश पटेल यांनी राष्ट्रीय गुप्तचर संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी 17 गुप्तचर संस्थांचे कामकाज पाहिले. मुलांमध्ये ट्रम्पला लोकप्रिय करण्यासाठी काश पटेल यांनी ‘द प्लॉट अगेन्स्ट द किंग’ हे पुस्तकही लिहिले आहे.