
या महिन्याच्या अखेरला म्हणजेच येत्या 28 फेब्रुवारीला आकाशात एक दुर्मिळ दृश्य पाहता येणार आहे. सूर्यमालेतील सात ग्रह अंतराळात एकत्र फिरताना दिसणार आहेत. याचाच अर्थ हे सर्व ग्रह एका सरळ रेषेत दिसणार आहेत. या अनोख्या घटनेला प्लॅनेटरी अलाइनमेंट किंवा प्लॅनेट परेड असे म्हटले जाते. अंतराळात घडणारी ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 28 फेब्रुवारीनंतर अशी घटना तब्बल 15 वर्षांनंतर अनुभवता येणार आहे. 28 ला हवामान स्वच्छ असेल तर युरेनस आणि नेपच्यून वगळता सर्व ग्रह उघडय़ा डोळय़ांनी पाहता येतील, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
खरं म्हणजे सौर मंडळातील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. ज्या वेळी सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला सरळ रेषेत असतात त्या वेळी सर्व ग्रह एका सरळ रेषेत दिसल्यास त्याला ग्रह परेड असे म्हणतात. या ग्रह परेडमध्ये आपल्याला केवळ गुरू, शुक्र, शनी आणि मंगळ असे ग्रह दिसतील. युरेनस आणि नेपच्युन पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता लागेल. पृथ्वीपासून खूप जास्त दूर असल्याने ते उघडय़ा डोळय़ांनी पाहता येत नाहीत. या परेडमध्ये तीन ते आठ ग्रह सहभागी होतील.
हम साथ साथ है
28 फेब्रुवारीला सर्व सात ग्रह एकाच रांगेत येतील. ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. हिंदुस्थानात हे दृश्य कुठूनही दिसेल, परंतु खगोलीय घटना पाहण्यासाठी आपल्याला शहरापासून दूर एका मोकळय़ा मैदानात जावे लागेल, जिथून हे दृश्य स्पष्टपणे दिसेल. जर हवामान स्वच्छ नसेल तर दुर्बिणीच्या मदतीने हा दुर्मिळ योगायोग पाहता येईल. ही खगोलीय घटना पाहण्याचा सर्वोत्तम वेळ सूर्यास्तानंतर अंदाजे 45 मिनिटे असा आहे. हे सर्व ग्रह एकाच रांगेत दिसल्यानंतर जणूकाही ते ‘हम साथ साथ है’ असेच सांगण्याचा प्रयत्न करतील.