
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱयांदा विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे धडाधड निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 145 वर्षांचा जुना डेस्क (टेबल) अचानक बदलला आहे. टेबल बदलण्यामागे अमेरिकेचे उद्योगपती एलन मस्क यांचा मुलगा असल्याची चर्चा आहे. एलन मस्क यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी मस्क यांचा मुलगा सुद्धा उपस्थित होता.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षाला कार्यालयातील 7 डेस्कपैकी एक डेस्क निवडण्याचा पर्याय मिळतो. हा डेस्क सीअॅण्डओचा असून खूपच प्रसिद्ध आहे. याचा वापर माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बूश यांच्यासह अन्य लोकांनी केला आहे. सध्या हा ओव्हल कार्यालयात ठेवण्यात आला होता. ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा डेस्क बी. हेस यांच्या नंतर प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी वापरला आहे. या डेस्कचा वापर पहिल्यांदा 1961 मध्ये करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर एक पोस्ट शेअर केली आहे. या टेबलची दुरुस्ती करण्याची गरज होती. त्यामुळे या टेबलऐवजी एक दुसरा सुंदर टेबल रिप्लेस करण्यात आला आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
उद्योगपती मस्क यांच्या मुलाचा ‘उद्योग’
डोनाल्ड ट्रम्प यांची एलन मस्क यांनी कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी मस्क यांचा मुलगा सुद्धा उपस्थित होता. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूला बसलेल्या या छोटय़ा मुलाने नाकात बोट घातल्यानंतर ते बोट या टेबलला पुसल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे या मुलाच्या या उद्योगाने ट्रम्प यांनी हा डेस्क बदलला आहे, अशी चर्चा आहे. परंतु याला कार्यालयाकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मस्क यांच्या मुलाची ओळख करून देताना ट्रम्प म्हणाले होते की, हे एक्स आहे आणि ते एक महान व्यक्ती आहेत. उच्च आयक्यू असलेले व्यक्ती आहेत.