
मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात पुण्यातील पाच पर्यटक बुडाले आहेत. या पर्यटकांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर ओंकार रामचंद्र भोसले याची प्रकृती गंभीर आहे.
पुण्याहून पाच मित्र फिरण्यासाठी मालवण येथे आले होते. हे पाचही जण शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी आले. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना समुद्रात खोलवर जाऊ नका असे बजावले होते. मात्र त्यांनी लोकांचे ऐकले नाही व खोल समुद्रात पोहायला गेले.
यावेळी पाण्याचा व्यवस्थित अंदाज न आल्याने ते पाचही जण बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून स्थानिक नागरिकांनी समुद्रात उड्या घेतल्या. पाचही जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले.