कानडी गुंडांचा पुन्हा हैदोस, चित्रदुर्गहुन परतणाऱ्या महाराष्ट्रातील एसटीच्या चालकाच्या चेहऱ्याला काळे फासले

गेल्या 68 वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कानडी अत्याचाराचे सत्र अजुनही थांबलेले नाही. शुक्रवारी रात्री उशीरा कन्नड रक्षक वेदिका या संघटनेच्या गुंडांनी चित्रदुर्ग येथून महाराष्ट्राकडे परत निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला अडवून, एसटी चालकाला कन्नड येते का विचारले. नाही म्हणताच त्या चालकाच्या तोंडाला आणि एसटीलाही काळे फासले. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय आहे.

शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बंगळुरू- मुंबई ही एसटी घेऊन चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. यावेळी रात्री उशिरा कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एसटी अडवून, चालकाकडे कन्नड येते का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे समजताच करवेच्या गुंडांनी चालकास थेट एसटीतून खाली उतरवून तोंडाला काळे फासले. तसेच एसटीला ही काळे फासले. यावेळी मराठीचा अवमान करणाऱ्या घोषणा देत, जर कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नसल्याच्या धमक्या ही देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान रात्री उशिरा याची माहिती मिळताच, महाराष्ट्रातून एसटी अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले. या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून, जर सीमाभागात प्रवास करताना सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

जोपर्यंत सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कर्नाटकमधील वाहतूक थांबवण्यात यावी – उत्तम पाटील

आंतरराज्य वाहतूकीवेळी दोन्ही राज्यात समन्वय असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र-कर्नाटकात वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण जर अशा मुद्द्यांवरून जीवघेणे हल्ले होणार असतील तर तसेच चालक आणि वाहक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महामंडळ घेत असेल तर आम्ही प्रवाशी घेऊन जायला तयार आहोत. त्यात आमची अडचण नाही. दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने एकत्र येऊन सुरक्षितेसंदर्भात निर्णय घ्यावा, असे एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव उत्तम पाटील यांनी सांगितले,