Champions Trophy 2025 – हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीत कोण विजयी होणार? कुंभमेळ्यातील आयआयटीयन बाबाची मोठी भविष्यवाणी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना रविवारी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. हिंदुस्थानने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत विजयाने श्रीगणेशा केला आहे, तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता दोन्ही संघ 23 फेब्रुवारीला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर भिडणार आहेत. या लढतीकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असताना कुंभमेळ्यातील आयआयटीयन बाबाने या लढतीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

आयआयटीयन बाबाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात या बाबाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीत कोण विजयी होईल याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीमुळे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी हैराण झाले आहेत. कारण आयआयटीयन बाबाने या लढतीत हिंदुस्थानचा पराभव होईल असे म्हटले आहे. यावर हिंदुस्थानच नाही तर पाकिस्तानच्या चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीय.

मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, यावेळी हिंदुस्थान जिंकणार नाही. विराट कोहलीसह हिंदुस्थानच्या खेळाडूंनी कितीही जोर लावला तरी निकाल बदलणार नाही. आता मीच सांगतोय तर हिंदुस्थान जिंकणार नाही. देव मोठा आहे की तुम्ही. यावेळी मी सगळे उलटे करून टाकले आहे, असे आयआयटीयन बाबा व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

कोण आहे आयआयटीयन बाबा?

अभय सिंह असे आयआयटीयन बाबाचे नाव आहे. त्यांचा जन्म हरयाणामध्ये झाला. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एयरो स्पेस अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, इतके शिक्षण घेऊनही त्यांनी संन्याय घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची प्रचंड चर्चा आहे.