ठाण्यातील 769 बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवा, पालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांबाबत प्रशासनावर टीकेची झोड उठताच ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव खडबडून जागे झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व 769 बेकायदा बांधकामांवर तत्काळ बुलडोझर चालवा, असे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासंदर्भात सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय केल्यास याद राखा.. असा सज्जड दमदेखील त्यांना दिला आहे. त्यामुळे किती बांधकामे प्रत्यक्षात तोडली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण, डोंबिवलीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर येताच ठाण्याच्या आयुक्तांनी आज आपल्या दालनात सर्व सहाय्यक आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांचा लेखाजोख घेतला. सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये 769 बेकायदा बांधकामे असून त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीतील बीट निरीक्षकांच्या डायरीत आहे. ही सर्व बांधकामे पक्की, अर्धी किंवा कच्ची कोणत्याही प्रकारची असतील तरी दयामाया न दाखवता तत्काळ जमीनदोस्त केलीच पाहिजेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

सर्व जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची

बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना अनेकदा काही गोष्टींकडे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता किंवा कुणाचा तरी दबाव आला अशा प्रकारची कारणे सांगून अधिकारी वेळ मारून नेतात. मात्र यापुढे अशी कोणतीही कारणे ऐकून घेणार नाही. बेकायदा बांधकामे तोडण्याची सगळी जबाबदारी ही सहाय्यक आयुक्तांचीच राहील, असे आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत बजावले.

अशी केली कानउघाडणी

■ बेकायदा बांधकामांची नोंद एकदा बीट डायरीमध्ये झाली की सहाय्यक आयुक्तांनी तेथे तातडीने जाऊन पाहणी करावी. त्यानंतर तोडकाम करताना स्वतः जातीने उपस्थित राहावे.
सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कुणाचा दबाव आल्यास तो झुगारून लावा.
■ बेकायदा बांधकामे तोडण्यासंदर्भात न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली असून बांधकामे निष्काषित करण्याच्या पद्धतीवरही टिप्पणी केली आहे. त्यामुळे नवी पद्धत स्वीकारावी लागेल.