साय-फाय – डूमक्रोलिंग

>> प्रसाद ताम्हनकर

काही वर्षांपूर्वी, साधारण कोरोना महामारीच्या काही काळानंतर आरोग्य विषयातील अनेक तज्ञ ‘डूमक्रोलिंग‘ अथवा ‘डूमसर्फिंग‘ इफेक्टविषयी अत्यंत काळजी घेण्याचा, त्यापासून सावध राहण्याचा सल्ला देत होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर डूमक्रोलिंग म्हणजे सतत नकारात्मक, दुःखद बातम्या वाचण्याने, तसे व्हिडीओ पाहण्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांना ‘डूमक्रोलिंग इफेक्ट’ असे म्हणतात. सतत अशा बातम्यांच्या संपर्कात राहिल्याने लोकांमध्ये नकारात्मकता वाढते, ते अत्यंत चिडचिडे होतात, सतत अस्वस्थ होतात आणि प्रत्येक वेळी कोणती ना कोणती अनामिक चिंता त्यांना लागून राहिलेली असते, जी त्यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घ्यायला लागते.

‘डूमक्रोलिंग’ हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे टेक्सास टेक युनिव्हर्सिटीतर्फे यासंदर्भात काही काळापूर्वी एक परीक्षण करण्यात आले. हे परीक्षण ‘हेल्थ कम्युनिकेशन जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामध्ये 1100 लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यातील 17 टक्के लोक हे डूमक्रोलिंग या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. त्यांचा शांतपणा, समाधान हे पूर्वीपेक्षा कमी झाले होते आणि ते सतत अस्वस्थ राहू लागले होते. त्यांना सतत वाईट बातम्या वाचण्याची, त्या शोधण्याची सवय लागलेली होती आणि संपूर्ण जग हे त्यांना एक भीतिदायक जागा आहे, असुरक्षित आहे असे वाटायला लागले होते.

यासंदर्भात बोलताना तज्ञ सांगतात की, मानवावर नकारात्मकतेचा प्रभाव अधिक पडतो, तो नकारात्मकतेकडे पटकन झुकतो. एखाद्याने केलेल्या प्रशंसेपेक्षा एखाद्याने केलेली टीका माणसावर जास्त प्रभाव टाकते. माणसाचे हेच वर्तन बातम्यांच्या बाबतीतदेखील लागू पडते. आपला मेंदू सकारात्मक शब्दांपेक्षा नकारात्मक शब्द हे जास्त वेगाने आणि प्रभावीपणे प्रोसेस करत असतो. त्यामुळे नकारात्मक शब्द हे सकारात्मक शब्दांपेक्षा जास्त काळ आपल्या आठवणीत राहतात. मानसशास्त्रज्ञ आणि ‘हफिंग्टन पोस्ट’ या माध्यम संस्थेने केलेल्या संयुक्त अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक सकाळी वाईट बातम्या वाचण्यात तीन मिनिटे घालवतात, ते सहा ते आठ तासांनंतर त्यांचा दिवस वाईट गेला असे म्हणण्याची शक्यता 27 टक्के जास्त असते. उलट जेव्हा यावर उपाय म्हणून तज्ञांनी दिलेल्या सकारात्मक बातम्या लोकांनी वाचल्या तेव्हा 88 टक्के लोकांनी त्यांचा दिवस चांगला गेल्याचे सांगितले.

या क्रोलिंगसंदर्भात बोलताना मानसशास्त्रज्ञ त्याचे वर्णन ‘अनलिमिटेड क्रोलिंग’ अर्थात ‘कधीही न संपणारे क्रोलिंग’ असे करतात. यासंदर्भात ते 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ब्रायन वॉन्सिक या संशोधकाने केलेल्या ‘बॉटमलेस सूप बाऊल एक्सपीरिमेंट’ या प्रयोगाचे उदाहरण देतात. या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांच्या एक गटाला तळ नसलेल्या वाटीत सूप देण्यात आले आणि एका गटाला तळ असलेल्या वाटीत आणि एका निश्चित प्रमाणात सूप देण्यात आले. वाटीला तळ नसलेल्या लोकांच्या वाटीमध्ये त्यांच्या नकळत सतत सूप भरले जात होते. हे तळ नसलेले लोक तळ असलेल्या लोकांच्या तुलनेत 73 टक्के जास्त सूप प्यायले. विशेष म्हणजे आपण इतके जास्त सूप प्यायल्याचे त्यांना कळले नाही आणि पोट भरल्याचेदेखील जाणवले नाही.

वरचे उदाहरण सतत नकारात्मक बातम्या वाचणाऱ्या, क्रोल करणाऱ्या लोकांना अत्यंत चपखल बसते. त्यांनादेखील समाधान झाल्याचे कधी जाणवत नाही आणि त्यांचे क्रोलिंगदेखील थांबत नाही. तज्ञ सांगतात की, ही अशी बातम्यांची, व्हिडीओची अॅप्लिकेशन बनवणारे लोकदेखील अत्यंत धूर्त आहेत. ते अॅप्लिकेशन बनवताना ‘पूल टू रिफ्रेश’ ही युक्ती वापरतात. तुम्ही क्रोल करत क्रीन जेव्हा खाली खेचता तेव्हा वरचे न्यूज फीड पुन्हा रिफ्रेश होते आणि तुम्ही काहीतरी नवी बातमी, माहिती आली असेल अशा आशेने पुन्हा वर जाऊन क्रोलिंगला सुरुवात करता. ही युक्ती सहसा जुगाराच्या अड्ड्यावर अर्थात कॅसिनोमध्ये वापरली जात असे. जुन्या काळी जुगार यंत्र फिरविण्यासाठी एक दांडा (लिव्हर) खाली खेचावा लागे. प्रत्येक वेळी लोक दांडा खेचताना त्यांना आता या वेळी तरी बक्षीस मिळेल अशी आशा वाटत असते आणि त्या विजयाची वाट पाहत असताना त्यांचा मेंदू आनंदी संप्रेरक (डोपामाईन) सोडत असतो आणि त्यामुळे कितीही हरले तरी लोक जिंकण्याच्या आशेने पुनः पुन्हा खेळत राहतात.

[email protected]