
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
परिपूर्णतावाद आणि नैराश्य हे हातात हात घालून येतात. कारण परिपूर्ण समजण्याच्या नादात व्यक्ती स्वतबद्दल ‘अति आदर्शवादी’ होते आणि स्वतभोवती कडक आणि अभेद्य कुंपण घालून घेते, जिथून तिला स्वतला बाहेर पडणे अशक्य असते. त्या आदर्शवादाच्या आणि अतार्किक विचाराच्या आधारावर त्या आयुष्य जगतात, पण यामुळेच त्यांचे इतरांशी नातेसंबंध बिघडायला सुरुवात होते.
रोहिणीताईंनी (नाव बदलले आहे) नुकतीच वयाची पन्नाशी ओलांडली होती. त्यांच्या मुलांनी आणि नवऱयाने मिळून त्यांच्यासाठी सरप्राईज पार्टी दिली होती, जिथे त्यांनी रोहिणीताईंच्या जुन्या मित्रपरिवाराला खास आमंत्रित केलं होतं. साधारण दोनेक महिने पार्टीचं व्यवस्थित आयोजन करून मुलांनी आणि नवऱयाने त्यांचा ‘सिक्रेट प्लॅन’ यशस्वी बनवण्याचा चंगच बांधला होता. त्या सर्वांची खटपट हीच होती की, निदान त्या दिवशी तरी रोहिणीताईंच्या चेहऱयावर हसू दिसावं. वाढदिवसाच्या दिवशी रोहिणीताई तयार झाल्या, हॉलमध्ये पाहुण्यांशी व्यवस्थित हसून बोलल्या, पण ते उसनं हसू होतं हे प्रतापरावांना (पती, नाव बदलले आहे) आणि मुलांना लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही. रोहिणीताईंच्या एक-दोन मैत्रिणींनाही ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी प्रतापरावांना याबाबत छेडलं असता ते उद्विग्न स्वरांत उत्तरले, “हिची ही अवस्था गेले तीन महिने अशीच आहे. काय चाललंय हिच्या मनात, काही कळत नाही. हिच्यासाठीच हा पार्टीचा खटाटोप केला मी आणि मुलांनी मिळून, जेणेकरून तिचं मन रमेल, पण ही उदासच आहे.’’
“मग तुम्ही मानसोपचारासाठी रोहिणीला का घेऊन जात नाही?’’ त्यांच्या मैत्रिणीने विचारलं.
“आई यायला तयार नाही..’’ अन्वय (मुलगा, नाव बदलले आहे) “मी बोलून बघते तिच्याशी’’ असं म्हणून मैत्रिणीने त्या दोघांना दिलासा दिला.
“रोहिणी, फक्त एकदा माझ्यासाठी म्हणून काऊन्सलिंगसाठी जाऊन ये. नाही पटलं तर नेक्स्ट टाइम नको जाऊस’’ मैत्रिणीने तोडगा सुचवून पहिला. त्या कशाबशा तयार झाल्या आणि त्याच दिवशी प्रतापरावांनी लगेच समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घेतली.
पहिल्या सत्रात ते स्वत रोहिणीताईंबरोबर आले होते. आल्यावर त्यांनी रोहिणीताईंची पार्श्वभूमी सांगताना त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडी-निवडीबद्दलही सांगितलं. शेवटी ते असेही म्हणाले, “आमच्याकडे कसलीही कमतरता नाही.’’ तेव्हाच त्यांना तोडत त्या पटकन उद्गारल्या, “खरंच?’’ आणि खिन्नपणे हसत त्यांनी मान हलवली आणि पुन्हा शांत बसल्या.
प्रतापराव पुन्हा गप्प झाले. शेवटी “मी बाहेर बसतो. तू
मॅडमना सांग काय होतंय तुला ते’’ असं म्हणत ते बाहेर गेले. रोहिणीताई आता बोलू लागल्या, “मॅडम, मी पहिल्यापासूनच थोडी जास्त शिस्तीची आहे. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या लागतात. मी माझ्या घरी शिस्तीत राहिले आणि माझ्या नवऱयाला, मुलांना शिस्तीत राहायला शिकवलं. यात माझं कुठे चुकलं? मी मुलांना अभ्यासाच्या आणि खेळाच्या वेळा ठरवून द्यायचे. त्याप्रमाणेच मुलांना वागायला सांगायचे. त्याचा त्यांना फायदाही झाला. माझा मोठा मुलगा प्रत्येक परीक्षेत उत्तम गुणांनी पास होत आला आहे. दुसराही ‘चांगलीच’ (या शब्दावर त्यांचा जोर होता) कामगिरी करतोय आणि प्रतापही त्याच्या बिझनेसमध्ये प्रगती करतोय. हे सगळं शिस्त आणि परिपूर्णतेमुळे होऊ शकलं, पण आता…?’’ हे बोलताना त्यांचा स्वर पुन्हा खाली आला आणि पुन्हा त्यांच्या डोळ्यांत आसवं जमा झाली.
“तुम्हाला इतकं दुःख कशाचं झालंय? तुम्ही कोणाशी बोलत नाही. फक्त तुमच्या खोलीमध्ये बसून असता. दैनंदिन कामंही तुम्हाला करावीशी वाटत नाहीयेत. खरं आहे का हे?’’
रोहिणीताईंनी होकारात्मक मान डोलावली, पण त्यांच्या एकंदरीत देहबोलीतून त्यांचा हताशपणा, हरलेपण स्पष्ट जाणवत होते. डोळ्यांखालची काळी वर्तुळे त्यांच्या मानसिक ढासळलेपणाची शक्यता वर्तवत होते. सत्रामध्ये त्यांच्याशी बोलताना आणि त्यांच्या एकंदर देहबोलीतून काही गोष्टी स्पष्ट होत गेल्या.
- त्यांचा स्वतबद्दल असलेला पराकोटीचा ‘आदर्शवाद’.
- त्यांची घरातल्यांकडून असलेली ‘परिपूर्णतेची अवास्तव अपेक्षा’.
या दोन मुख्य गोष्टींमुळे रोहिणीताई छोटय़ा मोठय़ा फरकानेही नाराज राहत होत्या. त्या दिवशीचा प्रसंग सांगताना प्रतापराव गहिवरले होते. “काय सांगू तुम्हाला मॅडम? आमचा धाकटा खेळायला गेला होता. त्या वेळी फक्त 15 मिनिटे उशिरा आला. तेव्हा रोहिणीने त्याला जे सुनावलं असेल की, ते ऐकवत नव्हतं. आळशी काय, बेजबाबदार काय, निर्लज्ज काय… तोंडाला तिच्या आवरच नव्हता. तोही डिस्टर्ब झाला. रात्री जेवलाच नाही. हिनेही सरळ सांगितलं. राहू दे असाच. शिस्त मोडल्याची शिक्षा.’’ हे सांगताना प्रतापराव बोलण्याच्या ओघात रोहिणीताईंची समस्या उलगडत गेले.
रोहिणीताई त्या प्रसंगानंतर अपराधाच्या भावनेने ग्रासल्या. कारण त्या एका प्रसंगाने त्यांच्यात आणि प्रतापरावांच्यात, मुलांच्यात दुरावा आला तर होताच, पण त्या प्रसंगाच्या कटू आठवणी आणि त्यांचे स्वतचे शब्द आठवून त्यांचं त्यांनाच वाईट वाटत राहिलं. पण मूळच्या असणाऱया त्यांच्या ताठ स्वभावाने उचल खाल्ली आणि त्यांनी घरातल्यांसमोर पडती बाजू घेतली नाही. त्यामुळे परिस्थिती अजून चिघळली आणि त्यांना नैराश्याचा त्रास सुरू झाला.
परिपूर्णतावाद आणि नैराश्य हे हातात हात घालून येतात. कारण परिपूर्ण समजण्याच्या नादात व्यक्ती स्वतबद्दल ‘अति आदर्शवादी’ होते आणि स्वतभोवती कडक आणि अभेद्य कुंपण घालून घेते, जिथून तिला स्वतला बाहेर पडणे अशक्य असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे व्यक्तीची ‘विश्वास प्रणाली,’ जी मुळातच कमकुवत असते. कारण अशा व्यक्तींना आतून कुठेतरी माहिती असतं की, त्या परिपूर्ण होऊ शकत नाहीत, पण तरीही त्या आदर्शवादाचा प्रयत्न करतच राहतात आणि त्यात गुरफटतात. त्यांच्या मनाने हे घेतलेले असते की, ‘थोडं अजून कडक राहिल्याने आपण नक्कीच परिपूर्ण होऊ.’ या अतार्किक विचाराच्या आधारावर त्या आयुष्य जगतात, पण यामुळेच त्यांचे इतरांशी नातेसंबंध बिघडायला सुरुवात होते. त्यांच्या संपर्कात असलेली माणसं दुरावली जातात, पण जर अशा व्यक्तींच्या स्वभावात ताठरपणा असेल तर त्यांना या दुराव्याचे काहीही वाटत नाही, पण मात्र जेव्हा गोष्टी टोकाला पोहोचतात तेव्हा या व्यक्ती स्वतला त्रास करून घेतातच, पण त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांनाही भावनिक त्रास देऊ शकतात. त्यामुळे या व्यक्ती एकटेपण अनुभवतात आणि जर हे जास्त झालं तर टोकाचं पाऊलही उचलू शकतात.
रोहिणीताईंच्या बाबतीत हे सगळं घडण्याची शक्यता होती, पण वेळीच प्रतापरावांनी त्यांना समुपदेशनासाठी आणलं. रोहिणीताईंच्या नैराश्याला मानसोपचार लागणार होते आणि जोडीला सत्रे आवश्यक होती. त्याप्रमाणे त्यांच्या उपचारांची दिशा ठरवली गेली आणि त्याप्रमाणे उपचार आणि सत्रे चालू झाली. रोहिणीताई सुरुवातीला जरी कंटाळा करत होत्या तरीही त्या यायच्या. स्वतबद्दल, स्वतच्या कर्तृत्वाबद्दल बोलायला त्यांना आवडायचं. त्यातूनच त्यांचे अतार्किक विचार शोधले गेले आणि ते बदलण्याची सुरुवात केली गेली.
जेव्हा त्यांना हे समजलं की, यामुळे मुलांवरही परिणाम झाला आहे तेव्हा त्या भानावर आल्या. “मी आता खरंच खचणार नाही. मला आता कळलंय की, शिस्त आणि परिपूर्णता ही देवालाही शक्य नाही. आपण तर माणसं आहोत. परिपूर्ण नसलो तरच आपण प्रगती करू शकतो, नाहीतर सगळंच सॅच्युरेशन होतं. मी बदलेन… माझ्या मुलांसाठी आणि प्रतापसाठी. मला प्लीज मदत करा.’’
रोहिणीताईंना झालेली ही जाणीव त्यांच्यातल्या संभाव्य बदलाची नांदी होती.
[email protected] (लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)