अभिप्राय- समर्थांच्या गुंतवणूक बोधाचा सार्थ वस्तुपाठ

>> श्रीकांत आंब्रे

संत तुकाराम व संत समर्थ रामदास या दोन्ही संतांनी आपापल्या ग्रंथांमधून अध्यात्म्य व भक्तिमार्गाबरोबरच सांसारिक व्यवहारज्ञानाचा सुबोध उपदेश केला आहे. त्यातही श्री समर्थांनी ‘दासबोध’ ग्रंथातील काही ओव्यांमधून प्रापंचिकाने संसार करताना गाठीशी असलेला पैसा मन मानेल तसा न उधळता आपल्या चांगल्या भविष्यासाठी त्याची योग्य रीतीने जपणूक करून तो अधिकाधिक वृद्धिंगत का व कशा पद्धतीने करावा याचं योग्य मार्गदर्शन केलं आहे. आता उपलब्ध असलेली गुंतवणुकीची कोणतीही साधनं नसताना व आर्थिक नियोजनाची संकल्पनाच त्या काळी लोकांमध्ये प्रचलित नसताना समर्थांनी सांगितलेल्या युक्तीच्या चार गोष्टी आज इतक्या वर्षांनंतरही तंतोतंत कशा सुसंगत ठरतात, हे प्रसिद्ध अर्थतज्ञ विनायक कुळकर्णी यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘समर्थ रामदासरचित दासबोधातील गुंतवणूक बोध’ या पुस्तकातून निदर्शनास येईल. दासबोधाच्या चिकित्सक अभ्यासातून त्यांनी हे नेमकेपणाने दाखवून दिलं आहे. दासबोधात जीवनाचं तत्त्वज्ञान सांगताना संसारातील व्यवहार ज्ञानाचं महत्त्व समर्थांच्या नजरेतून सुटत नाही. त्यासंबंधीच्या अर्थविषयाशी निगडित असलेल्या ओव्या लेखकाच्या नजरेतूनही सुटत नाहीत. त्यांचं निरूपण ते सोप्या भाषेत करत जातात आणि आजच्या काळातही समर्थांच्या त्या विचारांची उपयुक्तता कशी लागू पडते, याचं साधार विवेचन करतात.

माणसाच्या हाती पैसा का टिकत नाही याचं सोपं कारण समर्थांनी सांगितलं आहे… ‘लेकुरे उदंड झाली। ते तो लक्ष्मी निघोन गेली। बापर्डी भिकेस लागली। काही खाया मिळेना।।’ घरात कमावती व्यक्ती एकच असेल व खाणारी तोंडे भाराभर असतील तर पैसा या सर्वांमध्ये विभागला जातो आणि कमी असतील तर कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो हे साधंसोपं गणित व समर्थांनी त्या काळात केलेलं भाष्य आजच्या काळातही लागू पडतंच. लेखक स्वतः अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांना समर्थांनी सांगितलेली कारणे पटतात. अधिक खोलात जाऊन त्याचा बारकाईने संदर्भशोध घेताना आजच्या काळात हा खालावत चाललेला आर्थिक स्तर कसा उंचावता येईल याची ते आजच्या अर्थशास्त्राrय निकषाशी सांगड घालून सोप्या भाषेत चिकित्सा करतात. त्यातून गुंतवणूक बोधाची गुरुकिल्ली त्यांना सापडते. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याकडील रकमेचा योग्य विनियोग म्हणजे गुंतवणूक हे स्पष्ट करताना गुंतवणुकीचे अनेक मार्ग ते सांगत जातात. दासबोधातील ‘त्या’ ओव्यांशी त्याची सांगड घालत ते आपला मुद्दा अधिक स्पष्ट करतात. सारांश, पैसा कसा वाचवावा आणि आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी त्याचा योग्य विनियोग कशा पद्धतीने करावा, याचं मार्गदर्शनही करतात. मात्र या विवेचनाचा प्रत्येक धागा समर्थ रामदासांच्या त्यासंबंधीच्या उपदेशाशी जोडलेला असतो. शेअर्स गुंतवणुकीपासून आयुर्विमा, आरोग्य विमा, टपाल विमा, म्युच्युअल फंड, प्रॉव्हिडंट फंड, निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन याविषयी सुबोध मार्गदर्शन करताना आपली मालमत्ता किंवा उत्पन्न आणि महिन्याचा खर्च याचा योग्य ताळमेळ घालून पैसा कसा वाचवावा आणि वाढवावा, याचं इंगित स्पष्ट करतात. त्यामागे दासबोध हे त्यांचं प्रेरणास्थान आहे. त्याद्वारे सामान्य माणसाचं जीवन सुसह्य करण्याची तळमळ आहे. 2002 साली ‘सामना’ दैनिकात या पुस्तकातील लेखांचं सदर प्रसिद्ध झालं होतं. आर्थिक लिखाणातील क्लिष्ट परिभाषा टाळून सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेतील हे पुस्तक खूप काही शिकवून जाईल. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक दाजीशास्त्राr पणशीकरांची प्रस्तावना आणि कुळकर्णींना त्यांनी केलेलं मार्गदर्शनही पुस्तकासाठी उपयुक्त ठरलं आहे. “या पुस्तकातील दहा प्रकरणे म्हणजे ‘आर्थिक गुंतवणूक’ या विषयाचा वस्तुपाठच आहेत’’, हे दाजीशास्त्राRचं विधान खरंच आहे.

समर्थ रामदासरचित दासबोधातील गुंतवणूक बोध

लेखक ः विनायक कुळकर्णी n संपादन ः ऐश्वर्या कुमठेकर

प्रकाशक ः सकाळ मीडिया प्रा. लि., पुणे

पृष्ठे ः 87  n मूल्य ः रु. 150/-