स्वयंपुनर्विकासातून मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण, चारकोपच्या श्वेतांबरा सोसायटीतील रहिवाशांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप

स्वयंपुनर्विकास योजने अंतर्गत चारकोप येथील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास झाला आहे. या गृहप्रकल्पाचे उद्घाटन आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता चारकोप सेक्टर 1 येथील राजे शिवाजी मैदानात होणार आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने स्वयंपुनर्विकास योजने अंतर्गत श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास झाला आहे. या सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्यासह आमदार योगेश सागर, विधान परिषदेचे गटनेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.