
मराठी माणूस देशाच्या कानकोपऱ्यात आहे. मराठी साहित्याचा अमृतानुभव घेण्यासाठी आज आपण यमुनेच्या तीरावर जमलो, याचा मला अभिमान आहे, असे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात स्वागताध्यक्ष शरद पवार आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले.
राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? हे सांगताना शरद पवार म्हणाले, साहित्य संमेलन म्हटलं की इतर गोष्टींची चर्चा नेहमीच सुरू होते. त्यात नेहमीचाच विषय असतो, तो म्हणजे राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? यावर संमेलना आधी लिखाणही केलं जातं. टीकाही होते. काही जण समिक्षाही करतात. मात्र आपलं याबाबत स्वच्छ मत आहे ते म्हणजे यावर वाद कशाला करायचा? लोकमान्य टिळक, पंडीत जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांनी या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली.
पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर कलेला राजांनीही राजाश्रय दिला होता. छत्रपती संभाजी महाराज हे त्याचं बोलकं उदाहरण आहे. राजकारणी तर साहित्य क्षेत्रात आलेच, पण अनेक साहित्यिकांनीही राजकारणाच्या आखाडय़ात आपलं नशिब आजमावलं आहे. रा. धों. महानोर, लक्ष्मण माने यांचा उल्लेख या निमित्ताने करता येईल. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांची फारकत होऊ शकत नाही. ते एकमेकांना पूरक आहेत, असेही पवारांनी स्पष्ट केलं. समाज अत्यंत कठीण आणि नाजूक परिस्थितीतून जात असताना साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे, असेही पवार म्हणाले.
यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवर्जून आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मराठी भाषेचे विशुद्धीकरण सध्या होत असल्याचे सांगितले. ते टाळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.