
मुंबई महापालिकेने तब्बल 14 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महत्त्काकांक्षी कोस्टल रोडला महिनाभरातच तडे गेले असून या तडय़ांवर पालिकेने मास्टीक टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पालिकेची धावपळ उडाली आहे. डांबरीकरणाचे सांधे रुंद होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी आणि पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे रोखण्यासाठी अस्फाल्ट टाकल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकारामुळे पालिकेवर चहूबाजूंनी जोरदार टीका होत आहे.
कोस्टल रोडवरील उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै 2024मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या डांबरीकरणाचे सांधे रुंद होणे रोखण्यासाठी मास्टिकचे अतिरिक्त आवरण त्या ठिकाणी टाकण्यात आले आहे. पावसाळ्यात रस्ता सुरक्षित रहावा यासाठी असे करण्यात आले आहे. आता अस्फाल्टच्या नव्या निकषानुसार नवा थर देण्यात येणार असून येत्या 15 ते 20 दिवसांत या मार्गाचे स्वरूप पूर्ववत करण्यात येणार आहे.
- कोस्टल रोडला तडे गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर गुरुवारी चांगलेच क्हायरल झाले आहेत. अंदाजे 10.58 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडवरील हाजीअली मार्गावरील उड्डाणपुलावर हे तडे पडले असून ते मास्टिव डांबराने बुजवण्यात आले आहेत. मात्र ते वेडय़ावाकडय़ा पद्धतीने बुजवल्यामुळे असमतोल निर्माण झाला असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचेही या व्हिडिओतून निदर्शनास येत आहे.
मिंधे जिथे जाताततिथे वाट लागते!
मिंधे जिथे जिथे जातात, जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात. खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ ‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत, असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या पॅचवर्कवरून लगावला. आमचे सरकार असते तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड 2023लाच पूर्ण झाला असता आणि आजवर सायकल ट्रक, बागा तयार होऊन नागरिकांसाठी खुल्याही झाल्या असत्या, असेही ते म्हणाले.