
जम्मू-कश्मीरमधील पूंछ जिह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि आयईडी हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. सीमेजवळील तणाव रोखण्यासाठी हिंदुस्थान आणि पाकिस्तानने आज एलओसीजवळ फ्लॅग मीटिंग आयोजित केली होती. चक्कन-दा-बाग क्रॉसिंग पॉइंट परिसरात दोन्ही देशांतील ब्रिगेड कमांडर यांच्यात 75 मिनिटे बैठक झाली. या वेळी दोन्ही बाजूंनी सीमेवर शांतता राखण्याची गरज अधोरेखित केली.
सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात झाली असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी शांततेच्या दृष्टीने युद्धबंदी कराराचे पालन करण्याचे मान्य केले. नियंत्रण रेषेवर सुरू असलेला युद्धविराम कायम ठेवणे आणि एलओसीवर शांतता प्रस्थापित करणे अशा मुद्दय़ांवर या बैठकीत एकमत झाले. दरम्यान, मोठय़ा कालावधीनंतर दोन्ही देशांमध्ये अशी बैठक झाली आहे. शेवटची फ्लॅग मीटिंग 2021मध्ये झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून एलओसीवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.